मुंबई (रुपेश दळवी) – कोमेजलेली फुले, पहिले महायुद्ध, क्लासी ब्लॅक, ग्रीक देवता थेईया, जपानी मिलिटरी अशा विविध विषयांच्या फॅशनाविष्काराने ‘स्पार्कप्लग 2017’ हा शो सादर झाला. आयटीएम इन्स्टिट्युट ऑफ फॅशन, डिझाईन व टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी फॅशन शो साजरा केला. पदवीला असणार्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कलागुणांचे सादरीकरण केले.
संकल्पनात्मक वस्त्रांपासून ते तयार पोशाखांपर्यंत अनेक संकल्पनांवर भर देत विद्यार्थ्यांनी या शोमधील कपडे डिझाईन केले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी फॅशन इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. गिशा डिझाईन्सच्या फाऊंडर शालिनी जयकारिया, आदित्य बिर्लाच्या बिर्ला सेल्युलोजचे डिझाईन हेड नेल्सन जाफरी, अभिनेत्री व मॉडेल प्रियांका शर्मा, सुचेता शर्मा फॅशन शोसाठी उपस्थित होते.
इंटिरिअर डिझाईनच्या विद्यार्थ्यांनीही यावेळी त्यांचे रिसर्च व प्रोजेक्ट मॉडेल्स प्रदर्शित केले. अनेक कंपन्यांच्या दिग्गजांनी त्यांचे कौतुक केले. आयटीएम इन्स्टिट्युटने विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला पुढाकार देण्यासाठी केलेल्या या आयोजनात विद्यार्थ्यांनीही उत्तम कामगिरी बजावली, असे आयटीएमचे सीईओ नितीन म्हणाले. बिर्ला सेल्युलोजचे नेल्सन जाफरी यांनी फॅशन इंडस्ट्रीमधील प्लॅटफॉर्म्स वाढत असून नव्या मुलांना आपले टॅलेंट दाखवण्याची संधी मिळत असल्याचे सांगितले.