मुंबई : इटलीतील उद्योजकांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हॉटेल सेंट रेजिस येथे झालेल्या इटली-इंडिया बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
इटलीचे अर्थविकास मंत्री इव्हॉन स्कॅलफोर्टो, इटलीचे भारतातील राजदूत लॉरेंझो अँजे लोनी, मुख्य सचिव सुमित मल्लिक तसेच विविध उद्योग समुहाचे प्रतिनिधी, उद्योजकही उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इटली आणि भारताचे व्यापार विषयक संबंध शतकानुशतके राहिले आहेत. त्याला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. येथे चांगल्या पायाभूत सुविधा आहेत. उत्तम प्रकारचे कुशल मनुष्यबळ आहे. रस्त्याचे, रेल्वेचे जाळे आहे. विमान कनेक्टिव्हिटी आहे. उद्योजकांना फायदेशीर ठरणारे आर्थिक आणि उद्योग धोरण आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू होत आहे. पुणे आणि नागपूर विमानतळाचा विकास केला जात आहे. मुंबई-पुणे आणि नागपूर मध्ये मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण केले जात आहे. एकट्या महाराष्ट्र राज्यातून ६० टक्के फळांची निर्यात केली जाते. हे राज्य फलोत्पादनात आघाडीवर आहे. अनेक अन्न प्रक्रिया केंद्रे आहेत. उद्योजकांना येथे चांगल्या सुविधा मिळत असल्याने जगभरातून उद्योग येथे येत आहेत. कायदा सुव्यवस्था उत्तम आहे. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रही सुरू झाले आहे. मेक इन इंडिया च्या माध्यमातून उद्योजकांनी मोठी आर्थिक गुंतवणूकही केली आहे.
प्रारंभी इटलीचे अर्थ विकास मंत्री इव्हॉन स्कॅलफोर्टो यांनी प्रास्ताविकातून इटली-भारत बिझनेस फोरमचे स्वागत करून भारतीय उद्योजकांनी इटली मध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती करून आर्थिक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले