नवी दिल्ली : पीएसएलव्ही सी-३७ या इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपक यानाच्या ३९ व्या उड्डाणात ७१४ किलो वजनाच्या कार्टोसॅट-२ मालिकेतला उपग्रह तसेच इतर १०३ उपग्रहांचे श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन आंतरराष्ट्रीय केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्हीचे हे सलग ३८ वे यशस्वी प्रक्षेपण आहे. या सर्व १०४ उपग्रहांचे एकत्रित वजन १ हजार ३७८ किलो आहे.
पीएसएलव्ही-सी ३७ सकाळी ९ वाजून २८ मिनिटे या नियोजित वेळेवर बुधवारी अवकाशात झेपावले. १६ मिनिटे आणि ४८ सेकंदाच्या उड्डाणानंतर सर्व उपग्रह ५०६ किलोमीटरवरील पूर्वनियोजित भ्रमणकक्षेत पोहोचले आणि पुढील १२ मिनिटात पूर्व उपग्रह प्रक्षेपक यानापासून पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार यशस्वीरित्या वेगळे झाले. सर्वप्रथम कार्टोसॅट-२ उपग्रह आणि त्यानंतर आयएनएस-१ आणि आयएनएस-२ वेगळे झाले. पीएसएलव्ही प्रक्षेपक यानाद्वारे आतापर्यंत अवकाशात सोडण्यात आलेल्या भारतीय उपग्रहांची संख्या ४६ झाली आहे.
प्रक्षेपक यानापासून कार्टोसॅट-२ उपग्रह वेगळे झाल्यानंतर बेंगळुरूच्या इस्रोच्या आयएसपीआरएसी या उपग्रहाच्या प्रणालीवर नियंत्रण प्रस्थापित केलं असून आगामी काळात हा उपग्रह कृष्ण-धवल तसंच रंगीत छायाचित्र पाठवायला प्रारंभ करेल.
पीएसएलव्ही सी ३७ उपग्रह प्रक्षेपक यानाद्वारे प्रक्षेपण करण्यात आलेल्या इस्रो नॅनो उपग्रह-१ (आयएनएस-१)चे वजन ८.४ किलोग्रॅम तर आयएनएस-२ चे वजन ९ .७ किलोग्रॅम आहे. हे दोन्ही उपग्रह भारताचे तंत्रज्ञान प्रात्यक्षिक उपग्रह आहेत.
उर्वरित १०१ उपग्रहांपैकी अमेरिकेचे ९६ तर नेदरलँड, स्वित्झर्लंड, इस्रायल, कझाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीचा प्रत्येकी एक उपग्रह आहे.
या यशस्वी प्रक्षेपणानंतर पीएसएलव्ही या भारताच्या उपग्रह प्रक्षेपक यानाने प्रक्षेपित केलेल्या परदेशातील ग्राहक उपग्रहांची एकूण संख्या १८० वर पोहोचली आहे