राजदिप सरदेसाई २०२४ लोकसभा निवडणूकीवर त्यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. भुजबळांबद्दल मोठं विधान केलं आहे. “माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता. ईडीपासून सुटका झाल्याने अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला” अशी प्रतिक्रिया भुजबळांनी वैयक्तिक चर्चेत दिल्याची नोंद सरदेसाई यांच्या पु्स्तकात आहे.
सोशल मीडियामध्ये यावरून चर्चा रंगल्या आहेत, सरदेसाई यांची टीका फक्त राजकीय टिप्पणी आहे की सद्याच्या भाजपच्या ‘प्रो ओबीसी’ राजकारणाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न की पुस्तकासाठी चिप पब्लिसिटी ?? असा प्रश्न आता विचारला जातो आहे.
भुजबळांची प्रतिक्रिया
सरदेसाई यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, “ईडीपासून सुटका करण्यासाठी आम्ही भाजपाबरोबर गेलो, असा आरोप आमच्यावर नेहमीच होत आले आहेत. तसेच महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मला क्लीन चीट मिळाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मला क्लीन चीट मिळाली होती. याबद्दल मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पेढेही दिले होते. आम्ही विकासासाठी भाजपाबरोबर आलो होतो. महायुतीला पाठिंबा देण्यासाठी ५४ लोकांनी स्वाक्षरी केल्या होत्या. त्या सर्वांवर काय ईडीची चौकशी सुरू नव्हती. आम्ही फक्त मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारमध्ये सामील झालो होतो. त्याचा फायदा विकासासाठी आम्हाला झालेला आहे”,
प्रो ओबीसी राजकारणाला तडा देण्यासाठी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या भूमिका आरक्षणाच्या मुद्द्यावरुन परस्पर विरोधी आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. अनेकदा जरांगे यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत संबंध असल्याचे आरोप करण्यात आलेत. दुसरीकडे भाजपने आपला डीएनए ओबीसींचा असल्याचं अनेकदा म्हटलंय. मराठा समाजाची मागणी ही ओबीसीतून आरक्षण मिळावी अशी आहे. ओबीसी नेत्यांचा याला विरोध आहे. यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहिर केलंय. मराठा मतं लोकसभेत जशी एकगट्ठा होती तशी ती विधानसभेत राहिलेली नाहीत. तुलनेत लोकसभेनंतर ओबीसी आंदोलन मजबूत होत गेलं.
भुजबळ महायुतीचा एक भाग आहेत. ओबीसी आरक्षण रक्षणासाठी त्यांनी जरांगे विरूद्ध मोठी भूमिका घेतली आहे. त्यामुळे भुजबळांचा चेहरा वापरुन दादा गटासह भाजपही ओबीसी मतं आपल्या पारड्यात पडतील अशी अपेक्षा लावून आहेत. अशात भाजपने ओबीसी नेते छगन भुजबळ यांना ईडीचा धाक दाखवुन त्रास दिला. असं नरेटिव्ह उभं करण्याचं काम या पुस्तकातून होतं आहे. ओबीसी मतं भाजप आणि महायुतीपासून दुर नेण्यासाठी असं नरेटिव्ह उभं केलं जातंय का? असा प्रश्न सोशल मीडियामध्ये विचारला जातो आहे.
निवडणुकीच्यावेळीच पुस्तक का?
लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर होवून पाच महिन्यांहून अधिकचा काळ उलटला आहे. आत्ता विधानसभा निवडणूका सुरु आहेत. हे पुस्तक याच वेळेत का प्रकाशित झालं? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “निवडणुकीच्या वेळेलाच हे का छापले जात आहे? याबद्दल मला आश्चर्य वाटते. मी ते पुस्तक वाचलेले नाही. त्यात काय लिहिलेले आहे? हे नंतर पाहीन. आता सध्या माझे लक्ष प्रचारावर आहे. तसेच आमच्या वकिलांशीही मी चर्चा करेन. निवडणुकीनंतर जे जे चुकीचे आहे, त्यावर मी नक्कीच कारवाई करेन. नको नको त्या गोष्टी माझ्या तोंडी घातलेल्या आहेत, त्याला निश्चितच आम्ही उत्तर देऊ.”
सरदेसाईंचं वादांसोबत नेहमीचं नातं?
राजदिप सरदेसाई यांचं त्यांच्या दिर्घ अनुभवाप्रमाणेच त्यांचं वादांसोबत नातं राहिलेलं आहे.२०२१ ला दिल्लीत शेतकरी आंदोलन घडलं. यावेळी प्रजासत्ताक दिनी पोलिसांनी एका शेतकऱ्याला गोळी घालून ठार मारल्याचं ट्वीट सरदेसाई यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी टोकाची टीका केली होती. वास्तव पाहता ही माहिती खोटी असल्याचं समोर आलं. यानंतर सरदेसाईंनी ट्वीट डिलीट केलं. त्यांच्यावर माध्यमसंस्थेने कारवाई करत दोन आठवड्यांसाठी निलंबनाची कारवाई केली होती. सरदेसाईंनी या घटनेची माफी मागितली होती. सरदेसाईंच्या विश्वासार्हता वारंवार शंका उपस्थित केली जाते. अशा सरदेसाईंनी भुजबळांचा दाखला देत केलेल्या दाव्यात काही तथ्य नसल्याचे सुर व पुस्तकासाठी चिप पब्लिसिटी असलयाचे आरोप होत आहे.