मुंबई : मेक इन इंडिया कार्यक्रमानंतर भारतात विदेशी गुंतवणूक वाढली आहे. गेल्या तीन वर्षात पायाभूत सुविधांसाठीची गुंतवणूक वाढली असून देशात झालेल्या गुंतवणुकीच्या ४३ टक्के गुंतवणूक ही केवळ महाराष्ट्र राज्यात झाली आहे. पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीत आणि रोजगार निर्मितीत महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.‘इंडिया न्यूज’च्या वतीने ‘मंच महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे आयोजन बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स येथे करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी आयटीव्ही नेटवर्कचे संस्थापक आणि प्रोमोटर कार्तिकेया शर्मा, इंडिया न्यूजचे संपादकीय प्रमुख दीपक चौरासिया आदींसह मान्यवर उपस्थित होते.मंच महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये श्री. चौरासिया यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याशी विविध विषयांवर प्रश्नात्मक चर्चा केली. विविध मुद्द्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली.मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, सध्या सोशल मिडीयाचा वापर वाढत आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार माध्यमांवर गैरवापर होऊन मॉब लिचिंगसारख्या घटना या निंदनीय आहेत. मुंबई ही आर्थिक राजधानी असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, उद्योजक, व्यावसायिक यांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या शहराची सामाजिक गतीशिलता वाढविण्याच्या दृष्टीने महत्वाचे कार्य सुरू आहे. कोस्टल रोड, वेस्टन एक्सप्रेस हायवे, सी-लिंक, मुंबई- नवी मुंबई ट्रांन्स हार्बर लिंक, वॉटर ट्रान्सपोर्ट आदी वाहतुकीचे नवीन पर्याय उपलब्ध होणार आहेत. शाश्वत आणि पर्यावरणपूरक अशी दळणवळण व्यवस्था करण्यासाठी सामाजिक गतीशिलता जलद करण्यात येत आहे. यासाठी २५६ कि.मी.च्या मेट्रोला मान्यता मिळाली असून १२० किमीचे काम सुरू आहे. पाच वर्षात ९० लाख प्रवासी जलद पर्यावरणपूरक मेट्रोद्वारे प्रवास करू शकतील अशी दळणवळणाची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्यासाठी शासन कार्यरत असल्याची माहितीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.मुंबई शहरात भरतीच्यावेळी आणि अतीवृष्टीमुळे शहरात पाणी जमा होते. जास्तीत जास्त पम्पिंग स्टेशन निर्माण करून भरतीच्यावेळी पाण्याचा निचरा करण्यास मदत होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरात पाणी तुंबण्याच्या समस्या उद्भवणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. आजतागायत ४० लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले असून १० लाख शेतकऱ्यांसंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. शेतकऱ्यांची सिंचन क्षमता १८ टक्के वाढली असून, पाच लाख कृषीपंप वितरीत करण्यात आले आहेत. फलोत्पादन वाढविण्यासाठीच्या योजना आखण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविल्यामुळे लोकांच्या सहभागाने चांगले उत्पादन शेतकऱ्यांना घेता आले. राज्याचा कृषी उत्पन्न दर वाढविण्यास यामुळे मदत झाली. जलयुक्त शिवारमुळे पाण्याची साठवण क्षमता वाढली असून हे सर्व लोकसहभागामुळे करण्यास शासनाला यश आले आहे. या माध्यमातून १६ हजार गावे संपन्न करण्यात यश आले असून हे आजतागायतचे सर्वात मोठे यश असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.