मुंबई : सुदृढ निरोगी राष्ट्रासाठी योग करणे आवश्यक असून शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा. राज्य शासनांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील वांद्रे रेक्लमेशन जवळील योगा पार्क येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, खासदार पुनम महाजन, आमदार आशिष शेलार यावेळी उपस्थित होते.योग ही भारताने जगाला दिलेली मौल्यवान भेट असल्याचा उल्लेख करीत उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले की, यावर्षी योगदिना निमित्त ‘शांती साठी योग’अशी संकल्पना आहे. सकारात्मक विचारांना चालना देण्यासाठी योगासनं आवश्यक आहेत. सकारात्मक विचार विकासासाठी आवश्यक असून त्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा जेणेकरून निरोगी आणि सुदृढ राष्ट्राची निर्मिती करणे शक्य होईल. बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणाव वाढले आहेत ते योगामुळे दूर करणे सहज शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.