दरवर्षी 17 जुलै हा दिवस जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस (वर्ल्ड डे फॉर इंटरनॅशनल जस्टीस) म्हणून ओळखला जातो. या दिवसाला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिन किंवा आंतरराष्ट्रीय न्याय दिन असेही म्हंटले जाते.
स्थानिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कोणत्याही स्तरावरील असो, सामाजिक हिताच्या दृष्टीने गुन्हेगारी हा गंभीर असा विषय आहे. स्थानिक अथवा राष्ट्रीय पातळीवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी वर्तमान न्याय व्यवस्था आपापल्या परीने काटेकोर प्रयत्न करत असते. त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीची देखील तेवढ्याच गांभीर्याने दखल घेत त्यावर आवश्यक त्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि न्यायालयाचे कार्य आणि त्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
17 जुलै 1998 रोजी रोम परिनियम वर्धापनदिनानिमित्त हा दिवस आयोजित केला जातो ज्या द्वारे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना झाली.
सन 2010 रोजी कंपाला (युगांडा) मध्ये झालेल्या रूम विधान कायद्याचा आढावा परिषदेत राज्य पक्षांच्या असेंब्लीने 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाचा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाला प्रोत्साहन देणे आणि ICC च्या कार्याला पाठिंबा देण्याचा एक मार्ग हेच ह्या दिनविशेषाचे उद्दिष्ट आहे. ICC म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय. रोममध्ये 120 राज्यांनी एक कायदा स्वीकारला तेव्हा ही संस्था अस्तित्वात आली. आयसीसी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा रोम कायदा (“रोम स्टॅचर”) म्हणून ओळखले जात असे. ज्या देशांनी हा कायदा स्वीकारण्यास सहमती दर्शवली ते सर्व देश तत्कालीन गंभीर गुन्ह्यांवर खटला चालवण्यासंदर्भात आयसीसीच्या अधिकारक्षेत्राला मान्यता देत होते. राष्ट्रीय न्यायालय आणि न्याय व्यवस्थेची सन्माननिय जागा आणि अधिकार अबाधित ठेवत फक्त आंतरराष्ट्रीय खटल्यात हस्तक्षेप करण्यासाठी आयसीसी ला मान्यता दिली गेली.
या दिवसाचे उद्दिष्ट न्यायाचे समर्थन तसेच पीडितांच्या हक्कांना प्रोत्साहन देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक समविचारी नागरिकांना एकत्र आणणे , गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करणे तसेच जगभरात शांतता, सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहणे हे आहे.
जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन 2023 ची थीम –
दरवर्षी जागतिक न्याय दिन एका विशिष्ट थीम अंतर्गत साजरा केला जातो. 2023 च्या जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिनाची थीम “अडथळ्यांवर मात करणे आणि सामाजिक न्याय सर्वांना मिळवून देणे” अशी आहे.
समाजात घडणाऱ्या अनेक दुर्दैवी घटना, अन्याय, असमानता याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम या दिवसाच्या निमित्ताने जगभरात आयोजित केले जातात.
एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने या दिवसाची दखल घेत वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर येणाऱ्या या विषयाच्या अनुषंगाने नवीन पिढीसाठी प्रबोधनपर शिबिरे आणि चर्चा सत्रे, स्पर्धा यांचे आयोजन केले जाणे ही काळाची गरज आहे.
(सदर लेख प्राध्यापिका प्रज्ञा पंडित यांनी लिहिलेला आहे)