नवी दिल्ली : देशातील गरीब जनतेला अत्यल्प दरात अपघात विमा देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत’ (पीएमएसबीवाय) आतापर्यंत देशातील उद्दिष्टित १६ हजार ८५० खेड्यांमध्ये २६ लाख ११ हजार ७८७ विमाधारकांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रातील उद्दिष्टित १९२ खेड्यांमध्ये ४५ हजार ११५ विमा धारकांची नोंद झाली आहे.केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वतीने देशातील गोर-गरीब जनतेला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानली जाणारी ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ १ जून २०१५ पासून सुरु करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे उद्घाटन केले. योजनेनुसार वार्षिक १२ रूपये इतका प्रीमिअम असून अपघाती मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबियांस २ लाख रूपये किंवा अपघातात दुखापत झाल्यास उपचारासाठी १ लाख रूपये देण्यात येतात. बँक खाते असणारी १८ ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेस पात्र ठरते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या ग्राम स्वराज विभागाच्या वतीने या योजनेची अंमलबजाणी सुरु असून मागास खेड्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. आजपर्यंत देशभरातील उद्दिष्टित २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील १६ हजार ८५० खेड्यांमधे या योजनेच्या माध्यमातून २६ लाख ११ हजार ७८७ लोकांचा विमा उतरविण्यात आला आहे. ही योजना राबविण्यासाठी राज्यातील एकूण २३ जिल्ह्यांतील १९२ खेड्यांची निवड करण्यात आली व पीएमएसबीवाय योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु आहे. यानुसार विदर्भातील सर्वच ११ जिल्ह्यांतील १४० खेड्यांतील ३२ हजार ६६८ लोकांचा विमा उतरविण्यात आला. मराठवाड्यातील ७ जिल्ह्यातील ३९ खेड्यांतील ६ हजार ९९२, पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील ९ खेड्यांतील २०९७ लोकांना आणि खान्देशातील दोन जिल्ह्यातील ३ हजार ३५८ जणांना विमा सुरक्षा देण्यात आली आहे.