नवी दिल्ली : भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट धोरणाचा’ एक भाग म्हणून ‘आयएनएस सुकन्या’ ही युद्धनौका कमांडर एस.ए.देवधर यांच्या नेतृत्वाखाली इंडोनेशियामध्ये बेलावान येथे दाखल झाली. ही युद्धनौका कॉरपॅटच्या 30व्या आवृत्तीमध्ये तसेच भारतीय आणि इंडोनेशियन नौदलाच्या तिसऱ्या द्विपक्षीय अभ्यासात सहभागी होणार आहे. दोन्ही देशांमधील सागरी संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबवले जात आहेत.
24 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळात कॉरपॅटचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमांतर्गत भारताची इंडोनेशियाप्रती वचनबद्धता आणि भारताच्या सागरी सुरक्षेसाठीची सज्जता यासंदर्भात प्रात्यक्षिके केली जाणार आहेत.
बेलावान बंदरावर या युद्धनौकेचे वास्तव्य राहील. या अवधीत नौकेवरील अधिकारी आणि कर्मचारी नौदल संबंधी विविध प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होतील.