मुंबई : राज्याच्या विविध भागात उद्योग उभारणीसाठी उद्योजकांनी पुढाकार घेऊन रोजगार निर्मितीला चालना द्यावी. त्यामुळे राज्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
फिक्की’ च्या शिष्टमंडळाने आज एमएमआरडीए च्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील उद्योगक्षेत्राच्या विकासाविषयी चर्चा केली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अन्नधान्याची कमतरता नाही तथापि ते पिकविणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. राज्याच्या गरजेनुसार उद्योजकांनी सर्वंकष ठोस प्रस्ताव सादर केल्यास त्यांना क्विक रिस्पॉन्स विंडो उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातील सर्व शहरे विकसित होणेही आवश्यक आहे. शेती आणि मोठ्या उद्योगांबरोबरच प्रत्येक जिल्ह्याच्या गरजेनुसार त्या त्या भागात कृषीपूरक उद्योग सुरू झाल्यास राज्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. मुंबईच्या पूर्व किनाऱ्यांवर पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोठा वाव असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
उद्योग प्रत्यक्षात उभे राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी उद्योजकांनी राज्याचे दूत बनून आणि शहरांची ओळख कायम ठेवून विकासात्मक कामांचे प्रस्ताव सादर करावेत. त्यांना मदत करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगून, जगभरातील मुंबईकर उद्योजकांना सोबत घेण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी फिक्कीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील उद्योजकांमध्ये मोठी क्षमता असून विविध क्षेत्रात शासनासोबत काम करण्यास उद्योजक उत्सुक असल्याचे सांगितले.
एमएमआरडीए आणि युलू यांच्या माध्यमातून वांद्रे आणि कुर्ला परिसरात सुरू करण्यात येणाऱ्या विद्युत प्रभारीत दुचाकींचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
यावेळी नगरविकास तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे, फिक्कीच्या अध्यक्ष संगीता रेड्डी उपाध्यक्ष उदय शंकर यांच्यासह फिक्कीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.