मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारला आज आंबेडकर जयंतीची भेट सादर केली. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. त्या आधीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे आज हस्तांतरित करण्यात आली. विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी जमिनीची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तांतरित केली. इंदू मिलच्या जागेवर जनतेच्या मनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम लवकरच पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता, सामाजिक राज्यमंत्री दिलीप कांबळे, केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव पुष्पा सुब्रह्मण्यम, सहसचिव मधुकर रेड्डी, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे चेअरमन पी. सी. वैश्य, संचालक (मनुष्यबळ विकास ) आर. के. सिन्हा, संचालक (वित्त) अनिल गुप्ता, मुख्य सचिव सुमित मल्लिक, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहआयुक्त प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्रकुमार बागडे आदी यावेळी उपस्थित होते.
जमीन हस्तांतरण केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांचे आभार मानून मुख्यमंत्री म्हणाले की, देशातील सव्वाशे कोटी जनतेला संविधानाच्या माध्यमातून जगण्याचा अधिकार देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक इंदू मिल येथे व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून जनतेची मागणी होती. मात्र, जमीन मिळण्यासंदर्भात अडचणी येत होत्या. मात्र, याविषयी माहिती कळताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तातडीने निर्णय घेत स्मारकासाठी इंदू मिल येथील जागा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यासंबंधी केंद्रीय मंत्रिमंडळातही मान्यता घेतली. त्यानंतर ही जमीन राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही जमीन राज्य शासनाच्या नावे करण्यासाठी कागदपत्रे तयार करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वस्त्रोद्योग महामंडळ व मुंबई महानगरपालिकेने दोन दिवसात पूर्ण केली.
भव्यदिव्य स्मारकाचे काम जोमाने सुरू होणार
जमीन हस्तांतरित होण्यापूर्वी राज्य सरकारला या जागेवर काम सुरू करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले होते. त्याप्रमाणे राज्य सरकारने काम सुरू केले आहे. तसेच निविदाही काढली आहे. आता जमीन नावावर झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचार जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या भव्यदिव्य स्मारकाचे काम जोमाने सुरू होईल. स्मारकासाठी जमीन ताब्यात यावी, यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी ही जमीन मिळावी म्हणून खूप मेहनत घेतली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुढच्या वेळेस आंबेडकरांच्या भव्य स्मारकावर अभिवादन करण्यासाठी मी येणार : स्मृती इराणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आज पूर्ण होत आहे. या स्मारकासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत असलेल्या कष्टाची दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्मारकासाठी जमीन देण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय सहकार्य केले. ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने तत्परतेने काम केले. शासनाच्या वेगवान कामाचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. महाराष्ट्रातील जनतेचे स्वप्न पूर्ण लवकरच होणार आहे. पुढच्या वेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकावर अभिवादन करण्यासाठी मी येणार आहे, असे स्मृती इराणी म्हणाल्या.
देशवासियांसाठी आनंदाचा दिवस : आठवले
१५ वर्षांपासूनची मागणी आज पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्मारकासाठी सुमारे ३६०० कोटींची राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची इंदू मिल येथील जागा देण्यास पुढाकार घेतला आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला. संपूर्ण देशातील जनतेचे या प्रक्रियेकडे लक्ष आहे. त्यामुळे आज देशवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे. येत्या दोन वर्षांत स्मारकाचे काम पूर्णत्वास जाईल, असे आठवले म्हणाले. राजकुमार बडोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य स्मारक व्हावे, ही देशातील जनतेची भावना होती. आज स्मारकासाठी जमीन हस्तांतरित झाल्यामुळे मोठे काम झाले आहे. आता इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येईल.