मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्मारकाच्या जागेची तसेच प्रतिकृतीची पाहणी केली. स्मारकाच्या कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. दरम्यान, इंदू मिल येथे जगाला आवडेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून १४ एप्रिल २०२० पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल. २०१९ पर्यंत स्मारकाचे काम दृष्य स्वरुपात दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान, स्मारकाचे वास्तू विशारद शशी प्रभू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सचिव नागसेन कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरचे भव्यदिव्य असे स्मारक या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्मारकाच्या उंचीमुळे या भव्य स्मारकांचे वांद्रे वरळी सी लींकवरून देखील दर्शन घेता येईल. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या मिळविण्यात आल्या आहेत. स्मारकाच्या काम कालबध्द पध्दतीने होण्याबाबतचे निर्देशही संबंधितांना देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.