सिडनी, १० ऑक्टोबर, (क्री. प्र.): जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (WICF) ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताने सिंगापूरचा ३४ धावांनी पराभव करून विजय साजरा केला. आज झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात १०४ धावा केल्या तर सिंगापूरला ७० धावाच खुर्दा उडवला.
१६ षटकांच्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या चारही जोड्यांनी अनुक्रमे २७, ४१, ३ व ३३ धावांची कामगिरी केल्याने भारताला १०४ धावांची मजल मारता आली. तर भारतीय गोलंदाजांनी सिंगापूरच्या चार जोड्यांना अनुक्रमे -३, १८, २० व ३५ धावांवर रोखत भारताने मोठ्या विजयाला गवसणी घातली. भारताच्या गोलंदाजांनी १६ षटकात सिंगापूरचे एकूण ७ फलंदाजांना बाद केल्याने सिंगापूरच्या धावाफलकतून ३५ धावा वजा करता आल्या. तर सिंगापूरच्या गोलंदाजांनी १६ षटकात भारताचे एकूण ८ फलंदाजांना बाद केल्याने भारताच्या धावाफलकतून ४० धावा वजा करता आल्या. एकूणच भारताची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अतिशय उच्च दर्जाचे झाले.
भारता तर्फे अरिज अजीज (११) व सुरज रेड्डी (१६) या सलामीच्या जोडी नंतर दुसऱ्याच्या जोडीतील विजय हनुमंतरायाप्पा (२३) व अफ्रोज पाशा (१८), तिसऱ्या जोडीतील गिरीश गोपाल (०) व नमशीद व्हि. (३) व चौथ्या व शेवटच्या जोडीतील दैविक राय (१८) व यतीश चन्नाप्पा (१५) यांनी भारतासाठी जोरदार कामगिरीची नोंद केली.
सिंगापूरच्या पहिल्या जोडीमधील साळगांवकर जयेश (-१०) व कार्तिकेयन सुबरमानियन (७), दुसऱ्या जोडीमधील अभिनव चिंतामणि (११) व तमीम अब्दुल (७), तिसऱ्या जोडीतील रमेश वसंतकुमार (६), व नीरज प्रफुल (१४) तर शेवटच्या जोडीतील शरण स्वामिनाथन (१९) व कारी वेन (१६) यांना केलेली कामगिरी अपुरी ठरली.
भारताच्या विजय हनुमंतरायाप्पाने ४, अरिज अजीजने २ व नमशीदने १ फलंदाज बाद केले तर सिंगापूरच्या तमीम अब्दुलने ३, शरण स्वामिनाथनने २ तर कार्तिकेयन सुबरमानियन, रमेश वसंतकुमार व अभिनव चिंतामणि यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार भारताच्या विजय हनुमंतरायाप्पाला देऊन गौरवण्यात आले.
तर आज झालेल्या दुसर्या सामन्यात भारताला गत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून १०६ विरुध्द ६८ असे ३८ धावांनी पराभूत व्हावे लागले. काल झालेल्या २२ वर्षाखालील भारतीय संघाला सुध्दा ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते.