मुंबई : भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची प्रतिमा केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रभावी महिला नेत्या अशीच होती. १९६६ ते ७७ आणि १९८० ते ८४ या कालावधीत चार वेळा देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या गांधी यांनी आपल्या कणखर भूमिकेने आणि धाडसी निर्णयांनी भारताची स्वतंत्र ओळख निर्माण केली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधिमंडळात त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, नामांकित घराण्यात जन्मलेल्या गांधी यांनी आव्हानात्मक परिस्थितीत अतिशय समर्थपणे देशाची परिस्थिती हाताळली. लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढताना त्यांनी पंतप्रधान म्हणून देशहिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पाकिस्तानपासून असणारा धोका टाळताना त्यांची बांग्लादेशची निर्मिती करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांच्या या कार्याचा तत्कालिन विरोधी पक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील कौतुक करताना त्यांना ‘रणचंडिका – दुर्गा’ असल्याची उपमा दिली. गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण, गरीबांच्या कल्याणासाठी राबविलेला २० कलमी कार्यक्रम, संस्थानिकांचा तनखा रद्द करणे असे महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या काही निर्णयांना मोठा विरोध झाला तथापि त्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या.
फडणवीस म्हणाले, गांधी यांनी केवळ देशपातळीवरचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारताचा नावलौकिक वाढविणारे धाडसी निर्णय घेतले. शीतयुद्धाच्या काळात कोणत्याही एका गटाचे लेबल लावून न घेता त्यांनी देशाचे वेगळेपण जपले. बाह्य शक्तींची देशांतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ होणार नाही याची देखिल दक्षता घेतली. डिप्लोमसीमध्ये या निर्णयांचा पुढे चांगला उपयोग झाला. भारताचे हित लक्षात घेता सीटीबीटीच्या करारावर सह्या न करण्याचा निर्णय घेऊन त्यावरही त्या ठाम राहिल्या. १९७१ च्या युद्धात त्यांची भूमीका नेत्रदीपक ठरली, त्याचवेळी त्यांनी लष्करी सामर्थ्य वाढविण्याचाही निर्णय घेतला.
इंदिरा गांधी यांच्या देशपातळीवरील निर्णयांबाबत बोलताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, गांधी यांनी सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. हरित क्रांती, अन्न टंचाईवर मात यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. शेतमालाच्या उत्पादनात आमूलाग्र बदल घडविण्यात त्यांचे मोठे योगदान होते. १९७४ साली त्यांनी पोखरण येथे अणुचाचण्या घेऊन आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले. पंजाबमधील ब्लू स्टार ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांनी स्वत:चा कणखरपणा सिद्ध केला. प्रशासकीय सुसूत्रतेसाठी छोट्या राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. याच भूमिकेतून महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे मन वळविण्याच्या कामी देखील त्यांनी मोलाचे योगदान दिले. पंतप्रधान झाल्यानंतर सहा महिन्यांतच त्यांनी भारतीय वनसेवेची सुरूवात केली. आणिबाणीचा गांधी यांचा निर्णय योग्य नव्हता परंतु त्यामुळे त्यांची महानता कमी होत नाही असे मत देखील फडणवीस यांनी व्यक्त केले. त्यांची हत्या ही निषेधार्ह अशीच होती, असेही ते म्हणाले.
देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुतांश क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या उल्लेखाशिवाय स्वतंत्र भारताच्या इतिहासाचे पान पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांचे कार्य चिरस्मरणीय आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जन्मशताब्दी वर्षानिमित्त गांधी यांच्या कार्याचा गौरव केला.
या प्रस्तावावर विधानसभेत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम ) मंत्री एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री अजित पवार, गणपतराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड आदींनी सहभाग घेतला. तर विधानपरिषदेत या प्रस्तावावर उद्या मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.