डोंबिवली : डोंबिवली स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात होत असते स्टेशन परिसरात अनधिकृतपणे रिक्षा तळ असून तो हलवून चिमणी गल्लीतील महापालिकेच्या पाटकर प्लाझामध्ये हलवण्यात येणार आहे. या बदलामुळे इंदिराचौकातील रिक्षा तळ हलवल्याने चौक मोकळा श्वास घेणार असून नागरिकांना भाजी मार्केटमध्ये मुक्त संचार करता येणार आहे.
सध्या डोंबिवलीकर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत स्टेशन परिसरात प्रत्येक गल्लीत, रस्ते चौक हे रिक्षांचे अनधिकृत वाहन तळ झाले असून त्यातच मुख्य रस्त्यावर दुचाकी वाहनांचे पार्किंग असते. याशिवाय फेरीवाले आहेतच, यामुळे नागरिकांना चालणे अवघड झाले आहे. त्यातच पूर्व-पश्चिम जोडणारा कोपरपूल धोकादायक झाल्याने रेल्वेने तो बंद करुन दुरुस्त करण्याची सूचना दिली आहे. या पूलाचे दुरुस्तीचे काम रात्री करावे, हलकी वाहनांची वाहतूक सुरु ठेवण्यात यावी अशी सूचना वाहतूक नियंत्रण पोलीसानी केली आहे. मात्र अजूनही रेल्वे व पालिकेने पोलीसांना याबाबत कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. यातच राज्यंमंत्री रवीद्र चव्हाण यांनी चिमणी गल्लीतील पाटकर प्लाझा इमारतीत असलेले वाहन तळ रिक्षा स्टँडसाठी द्यावेत अशी सूचना केली आहे. यामुळे इंदिराचौक, चिमणी गल्ली, पालिकेजवळील स्टँड, मानपाडा रोड येथील सुमारे तीन ते चार हजार रिक्षांचे वाहनतळ बंद करण्याची योजना आहे. असे झाले तर इंदिराचौक वाहतूक कोंडीपासून मोकळा श्वास घेणार आहे. मात्र पाटकर प्लाझामध्ये केवळ 125 ते 150 रिक्षा उभ्या राहू शकतात. यिाशवाय पाटकर प्लाझामधील वाहनतळ हे दुचाकी वाहनांसाठी बांधण्यात आल्याचे पालिकेचे अधिकारी सांगतात. सध्या दुचाकी वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत त्यांच्याकडून पालिकेने पैसे घ्यावेत अशी सूचना पुढे आली आहे. याशिवाय परिवहन सेवेच्या बसेस नेहरु रोड येथून सोडण्याची योजना आहे.
महापालिकेने जोशी शाळेजवळ जो उड्डाण पूल बांधला आहे तो गणेश मंदिर ते ब्रिज हा एकदिशा मार्ग करण्यात येणार असून या पूलावरील वाहतूकीची होणारी कोंडा लक्षात घेऊन लवकरच एकदिशा मार्ग करण्याचे नियोजन सुरु असल्याचे वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण सतीश जाधव यांनी सांगीतले. पाटकर प्लाझा येथे रिक्षातळ हलवण्याची योजना असून तसे नियोजन करत असल्याचे मान्य केले. मात्र अजून तशी अधिकृत मान्यता नसल्याचे त्यानी कबूल केले.