मुंबई: डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. श्वेता शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली, केवळ महिलांच्या पहिल्यावहिल्या राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली असून, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महिला उमेदवारांसाठी 50% आरक्षण मिळवण्याचे या पक्षाचे उद्दिष्ट आहे.
मातांचा पक्ष असलेला नॅशनल विमेन्स पार्टी (एनडब्लूपी) हे संसदेमध्ये महिलांचे पुरुषांइतकेच प्रतिनिधीत्व असावे, हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल आहे. राजकारणातील स्त्री-पुरुष असमानता कमी करण्याच्या हेतूने या पक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे या पुरुषसत्ताक समाजात महिलांचेही समान महत्त्व निर्माण होणार आहे.
“संसदेमध्ये आरक्षण मिळवण्यासाठीचा लढा गेली वीसेक वर्षे सुरू आहे. आपल्या समाजात बहुतांश राजकीय निर्णय पुरुषच घेतात आणि संसदेमध्ये महिलांचे समान प्रतिनिधीत्व नाही, यामुळे महिला सबलीकरणाची शक्यता कमी होते. या पक्षाच्या उपक्रमाच्या माध्यमातून, महिलांच्या संपूर्ण विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे महिलांना त्यांची क्षमता पूर्णतः आजमावता येईल आणि त्यांच्या सक्षमीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीही मदत होईल,” असे शेट्टी यांनी नमूद केले.
भविष्यातील नियोजनाबद्दल बोलताना, एनडब्लूपीने लवकरच महिला रक्षक (सेफ्टी अॅप) हे मोबाइल अॅप दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. आणीबाणीच्या वेळी महिलांना मदत उपलब्ध करणे, हे या अॅपमागील हेतू आहे. अॅप युजर कोणत्याही संकटात असल्यास युजरने केवळ आपला फोन हलवावा किंवा अनेक वेळा ‘HELP’ असे म्हणावे, यामुळे 3 मित्रांना व नातेवाईकांना SMS अलर्ट पाठवला जाईल.
“अलीकडच्या काळात वाढलेले गुन्ह्यांचे प्रमाण पाहता, महिलांची सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. या उपक्रमाद्वारे, प्रत्येक स्त्रीला मोकळेपणे जीवन जगता यावे आणि कोणत्याही धोक्याविना घराबाहेर पडता यावे, अशी माझी अपेक्षा आहे,” असे त्यांनी सांगितले.
एनडब्लूपीने प्रत्येक राज्यामध्ये युथ पार्लमेंट (महिलांसाठी राजकीय शाळा) सुरू करायचेही ठरवले आहे. याद्वारे प्रत्यक्षातील व शैक्षणिक प्रशिक्षण दिले जाणार असून राजकीय प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी महिलांनी उत्तेजन दिले जाणार आहे.