पुणे : देशातील पहिल्या बायो-रिफायनरी प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दौंड तालुक्यातील पाटेठाण येथे श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्यावर केले.
यावेळी महाराष्ट्र प्राकृतिक गॅस लिमिटेडचे संचालक राजेश पांडे, श्रीनाथ मस्कोबा कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास रासकर, “प्राज”चे प्रमुख प्रमोद चौधरी, श्रीपाद ढेकणे, पाटेठाणच्या सरपंच आशाताई मांढरे उपस्थित होत्या.
गडकरी म्हणाले, या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होणारे जैव इंधन पर्यावरणपूरक असून कृषी क्षेत्राला उभारी देणारे आहे. याठिकाणी उभारण्यात आलेला हा भारतातील पहिला एकात्मिक बायो-रिफायनरी प्रकल्प आहे. या प्रगत जैव-रिफायनरी तंत्रज्ञानाद्वारे बायोमासच्या विविधतेपासून एकूण एक दशलक्ष लिटर प्रति वर्ष (एमएलपीए) इथेनॉलची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या देशाचा ऊर्जा स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. शेतातील शेती-कचऱ्यापासून इथेनॉल तयार होणार आहे.
जैवइंधन हे आपल्या देशाला आयात कराव्या लागणाऱ्या इंधनाला प्रदुषणमुक्त पर्याय देखील आहे. या बायोइंधनाचा फायदा सरकार, शेतकरी, उद्योग आणि ग्राहकांना होणार आहे. शेतीत निघणाऱ्या कचऱ्यालाही यामुळे किंमत मिळणार असून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादनाचे साधन उपलब्ध झाले आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांतीकारी बदल होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी “प्राज”चे प्रमोद चौधरी यांनी या प्रकल्पाची माहिती दिली.