मुंबई: १० मार्च: भारतासहित जगभरात दिनांक ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा झाला. प्राचीन गार्गी, मैत्रेयी व उभय भारती यांच्यापासून मध्ययुगीन जिजाबाई, झांसीची राणी लक्ष्मीबाई व किट्टूरची राणी चेन्नम्मा आणि आधुनिक काळातील सर्वच क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या महिलांपर्यंत भारतात सक्षम महिलांची एक दीर्घ परंपरा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमेनच्या (सीएसडब्ल्यू) ६९व्या सत्रात युएनच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात १० ते २१ मार्च दरम्यान सात प्रतिनिधी यशस्वीरित्या पाठविल्याची घोषणा करताना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला अभिमान वाटतो.
भिन्न पार्श्वभूमीच्या महिला प्रतिनिधी
संयुक्त राष्ट्रांच्या या कार्यक्रमात भारतीय प्रतिनिधी मंडळात म्हाळगी प्रबोधिनीने नामांकन केलेल्या सात महिला या भिन्न व्यावसायिक व शैक्षणिक पार्श्वभूमीच्या आहेत. भारतीय स्त्री शक्ती (बीएसएस) या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पाठविलेले हे प्रतिनिधी मंडळ स्त्री-पुरुष समानता आणि महिलांच्या समस्या व संबंधित विषयांवर भारतीय दृष्टीकोन मांडेल. श्रीमती नयना सहस्रबुद्धे या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील आहेत, तर श्रीमती रागिणी चंद्रात्रे व श्रीमती सीमा देशपांडे या सामाजिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. अॅड. प्रतिमा लाक्रा या कायदेतज्ञ आहेत आणि डॉ. प्राची मोघे पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत. श्रीमती सीमा कांबळे या दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या महिला विभागाच्या सल्लागार आहेत, तर श्रीमती भारती मल्लमपती या आयटी क्षेत्रातील आहेत. येथे याचा उल्लेख उचित ठरेल की २००६ पासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक सभेसाठी (युएन इकोसॉक) विशेष सल्लागार दर्जा असलेली संस्था म्हणून कार्यरत आहे.
संयुक्त राष्ट्र सीएसडब्ल्यू ६९ची वैशिष्ट्ये
संयुक्त राष्ट्र सीएसडब्ल्यू च्या ६९व्या सत्रात बीजिंग डिक्लेरेशन अँड प्लॅटफॉर्म फॉर अॅक्षन आणि सामान्य सभेच्या २३व्या विशेष सत्राचे फलित यांच्या अंमलबजावणीची समीक्षा व मुल्यांकन केले जाईल. स्त्री-पुरुष समानता आणि महिला सबलीकरण साध्य करण्यात सध्याच्या आव्हानांचा आढावा घेणे हा मुख्य हेतू राहील. ही ध्येये साध्य करण्यासाठी जगभरच्या महिला प्रतिनिधी त्यांची मते व शिफारशी यादरम्यान मांडतील.