इंडियन मर्चंट चेंबरच्या महिला शाखेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद
मुंबई : इंडियन मर्चंट चेंबरच्या महिला शाखेने गेल्या ५० वर्षात केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था जेव्हा ५० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करते तेव्हा तो एक इतिहास बनतो. माझ्या मते ज्या महिलांना संधी ,पाठिंबा मिळतो त्या महिला पुरुषांपेक्षाही उत्तम कामगिरी करतात, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. इंडियन मर्चंट चेंबरच्या महिला शाखेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थित महिला उद्योजकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र शासन एक रोडमॅप ठरवत आहे. या आराखड्यामध्ये इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि त्यांच्या महिला शाखेने योगदान द्यावे, असे आवाहनदेखील पंतप्रधानांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, अभिनेत्री कतरिना कैफ, फॅशन डिझायनर शायना एनसी यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला उद्योजिका उपस्थित होत्या.
पंतप्रधान म्हणाले की, ५० वर्षांत आयएमसीने महिलांसाठी काम करताना त्यांना स्वयंभू बनविण्यासाठी केलेले प्रयत्न अभिनंदनास पात्र आहेत. ‘पंचायत ते सांसद’ व ‘गाव ते सिलिकॉन व्हॅली’ असा आजच्या महिलांचा प्रवास राहिला आहे. कृषि, पशुपालन, आदिवासी विकास या क्षेत्रात तर महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे म्हणूनच या महिलांना अधिकाधिक सक्षम करणे ही आपली जबाबदारी आहे. संयम, सामर्थ्य आणि संघर्ष करण्याची ताकद या उपजत गुणांमुळेच महिला आकाशाला गवसणी घालू शकतात हे आज त्यांनी दाखवून दिले आहे.
गेल्या ५० वर्षात संपूर्ण समाजव्यवस्थाच बदलत होती, याच दरम्यान आयएमसी महिला शाखेने आपल्या स्वतःचा एक आगळा वेगळा ठसा उमटवण्याचे काम केले. गेल्या ५० वर्षातील या शाखेची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.