रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): इंडियन मेडिकल असोसिएशनची राज्यस्तरीय परिषद येत्या 7 व 8 ऑक्टोबरला रत्नागिरीत होणार आहे. रत्नागिरीमध्ये 28 वर्षांनंतर पहिल्यांदाच हि परिषद होत आहे. ‘इवकॉन’ असं या परिषदेचं नाव असून, ही परिषद आयएमएच्या स्त्री वैद्यकीय व्यावसायिकांच्या उपशाखेतर्फे आयोजित करण्यात आली आहे. यासाठी राज्यभरातून एमबीबीएस व अॅलोपॅथीचे 120 डॉक्टर सहभागी होणार आहेत.
यासंदर्भात आयएमएचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे, महिला उपशाखेच्या पदाधिकारी डॉ. रश्मी आठल्ये यांनी माहिती पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी डॉ. तोरल शिंदे, डॉ. पराग पाथरे, डॉ. सोनाली पाथरे, डॉ. अतुल ढगे उपस्थित होते.
महिलांच्या समस्यांविषयी या परिषदेत चर्चासत्र होणार आहे. याकरिता नितीन दाढे, डॉ. किरण शाह, डॉ. सय्यद, डॉ. चावला, डॉ. उत्तुरे, डॉ. राहुल शिंपी आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सध्याच्या स्त्री-पुरुष समानता युगामध्ये स्त्रियांना शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वयात येणार्या मुलींमध्ये अनियमित पाळी म्हणजेच पीसीओएस हा आजार, शालेय मुलींमध्ये नैराश्य, एकटेपणामुळे सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, यामुळे पाय घसरतो व कुमारी मातांचे प्रमाण वाढत आहे. तरुण वयात नोकरी करणार्या मुलींमध्येही मासिक पाळीची समस्या आढळून येते. त्यातून पुढे वंध्यत्वाचे प्रमाण वाढते. तसेच स्त्रियांमधील मधुमेह, रक्तदाब, अॅनिमिया, एचआयव्हीसारखे आजार यावरही परिषदेत चर्चासत्र होणार आहे.
स्त्री वैद्यकीय व्यावसायिकांची उपशाखा गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे. रत्नागिरीतही आता महिला डॉक्टरांची संख्या वाढली आहे. डॉक्टरांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी अशा परिषदा आयोजित केल्या जातात.