मुंबई : गेल्या काही काळापासून तेल बाजारात अतिरिक्त पुरवठा होत आहे. सौदीची अरामको कंपनीने दिवसाला दोन दशलक्ष बॅरलने उत्पादन वाढविले आहे. तर रशियाच्या पीजेएससी कंपनीनेही १ एप्रिलपासून दिवसाला ३ लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे. या घडामोडींचा परिणाम म्हणजे अतिरिक्त पुरवठा झालेल्या बाजारातील तेलाच्या किंमती कोसळतील. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मागणी कमी होत असल्याने हे घडत आहे.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे डीव्हीपी इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट, ज्योती रॉय यांनी सांगितले की, ‘या परिस्थितीचा भारताला लाभ होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या किंमतीत १०% घट झाल्याचा थेट परिणाम सीपीआय चलनवाढीवर ४० ते ५० बीपीएसवर पडतो. क्रूड किंमतीत दर १० डॉलर्स/बीबीएल कमी झाल्यास अंदाजे १६.३ अब्ज डॉलर्स विदेशी चलन वाचू शकेल. २०१९ मध्ये आपल्या देशाने ४.४८ दशलक्ष बीपीडी तेल आयात केले होते. आता आपण ५ हजार कोटीं रुपये किंमतीचे क्रूड विकत घेण्याचे ठरवले आहे. भारताच्या पेट्रोलियम धोरणानुसार, ५.३३ मेट्रिक टन एवढा साठा होईल. यापूर्वी त्याच्या निम्माच होता. याआधी इंधनाचे दर कमी झाले तरी ग्राहकांचे डिस्पोजेबल उत्पन्न वाढलेले दिसले. त्यामुळे क्रूड तेलाच्या किंमती घसरणे, विशेषत: कोव्हीड १९च्या उद्रेकाच्या धर्तीवर होणाऱ्या या घडामोडी भारताच्या पथ्यावर पडतील.’