
कोरोनामुुळे लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक ठिकाणी सध्या रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. वाहनांचीही म्हणावी तशी वर्दळ नसते. त्यामुळे वन्यपशू बिनधास्तपणे वावरू लागले आहेत. मुंबई – गोवा महामार्गावरील अंजणारी येथे गव्यांचा कळप रस्त्याच्या जवळ येऊन निर्धास्तपणे चरताना पहायला मिळाला. अंजणारी येथे चौपदरीकरणाच्या कामामुळे करण्यात आलेल्या कटींगवर हा कळप पहायला मिळाला. शुक्रवारी(17) सायंकाळी सुमारे सोळा गवे या ठिकाणी होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रवाशांनी हा कळप पाहील्यानंतर व्हीडीओ तयार केला. आणि हा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकण्यात आला. जवळच्या जंगलातून गवे आले असावेत अशी शक्यता वर्तविली जात आहे. ही बाब वन विभागाला समजल्यानंतर अंजणारी येथे पथक दाखल झाले आणि या भागाची पाहणी केली. त्यांना तत्काळ पकडणे अशक्य असल्यामुळे आजुबाजूच्या लोकांना काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात कोकणात भातशेती केली जाते. या शेतांचे गवे नुकसान करतात. हा प्राणी एकाच ठिकाणी थांबत नाही. तो पुढे पुढे प्रवास करत राहतो.
दरम्यान संगमेश्वर , लांजा येथील जंगल परिसरात गेल्या चार ते पाच वर्षात गव्यांचे दर्शन होऊ लागले आहे. संगमेश्वरात अगदी लोकवस्तीजवळच गव्याचे दर्शन झाले होते. संगमेश्वरमध्ये अनेकवेळा गव्याने शेतीचे नुकसान केल्याच्या घटना घडलेल्या आहेत .