
मुंबई, 30 जून : मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कल यांच्या संयुक्तपणे सुरूवातीला मुंबई ते पुणे आणि नागपूर दरम्यान सुरू केलेली भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा आता सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि अकोला येथे उपलब्ध होत आहे.
कोविड -१९ च्या सद्यस्थितीत, व्यक्ती आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांना त्यांच्या मोठ्या आकाराच्या आवश्यक आणि इतर वस्तूंची वाहतूक करणे कठीण जात आहे. बऱ्याच लोकांकडून पार्सल पाठविण्यासाठी स्पीड पोस्टची सेवा मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. तथापि, ग्राहकांना जास्त वजनाच्या स्लॅबमध्ये असलेल्या वस्तू बुकिंगसाठी पोस्ट ऑफिसमध्ये नेणे अवघड जात आहे.
मध्य रेल्वेमार्फत चालविण्यात येणा-या विशेष पार्सल गाड्यांचा विचार करून, मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कलने भारतीय टपाल सेवा व भारतीय रेल्वेच्या क्षमता एकत्रित करून भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा दि. १५.५.२०२० पासून मुंबई, पुणे आणि नागपूर स्थानकांमधून आणि दरम्यान उपलब्ध करून दिली आहे.
भारतीय टपाल सेवा ग्राहकांच्या आवारातून वस्तू घेते आणि मध्य रेल्वे द्वारा चालविल्या जाणार्या विशेष पार्सल गाड्यां आणि पोस्टल मेल मोटर सर्व्हिसद्वारे गंतव्यस्थानावर वस्तू पोहोचवते. ही सेवा ग्राहकांना किफायतशीर दराने आणि डोअर -टू -डोअर वाहतुकीच्या सेवा सुविधेसह किफायतशीर ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी ग्राहकांनी 9324656108 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा adpsmailmah@gmail.com वर ईमेल करू शकतात.