नवी दिल्ली, 18 जून 2021 : पर्यावरण क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांनी आज सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. भारताकडून पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर आणि भूतानकडून परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय पर्यावरण आयोगाचे अध्यक्ष लिऑनपो डॉ. तांडी दोरजी यांनी या सामंजस्य करारावर सह्या केल्या.
या प्रसंगी बोलताना जावडेकर म्हणाले की, “या सामंजस्य करारामुळे हवामान बदल, कचरा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याची नवीन कवाडे खुली होतील.दोन्ही देशांमधील संबंध महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत ते म्हणाले की, भारताला भूतानशी हवामान बदलासह पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर संबंध वृद्धिंगत करायचे आहेत.
वायु प्रदूषण रोखणे, कचरा व्यवस्थापन, रसायने व्यवस्थापन, हवामान बदल इत्यादी क्षेत्रात उत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी भारत आणि भूतान भागीदारी आणि सहकार्य वाढविण्यासाठी, सामंजस्य करार हे एक व्यासपीठ आहे. यामुळे परस्पर क्षेत्रात संयुक्त प्रकल्प होण्याची शक्यता देखील आहे. दोन्ही देशांमध्ये परस्पर हिताच्या भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी या सामंजस्य करारामुळे तंत्रज्ञान, वैज्ञानिक आणि व्यवस्थापन क्षमता देखील बळकट होईल आणि पर्यावरण क्षेत्रात सहकार्याचा विस्तार होईल