
रत्नागिरी, 29 June : आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या असताना देखील भारतीय बाजारात पेट्रोल डिझेलच्या किमती मात्र झपाट्यानं वाढत आहेत. त्याविरोधात आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. रत्नागिरीतही जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तसेच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड विजय भोसले, आमदार हुस्नबानो खलिफे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना काँग्रेसकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘संपुर्ण जगामध्ये अर्थव्यवस्था ढासळल्या असताना व इंधनाचे दर संपुर्ण जगामध्ये कोसळले असताना भारत सरकारने मात्र देशातील जनतेवर अन्यायकारक दरवाढ लावलेली आहे. अगोदरच कोविड १ ९ परिस्थितीमुळे देशातील जनता हतबल आहे . नविन दरवाढीमुळे जनतेची परिस्थिती अधिक दयनीय झालेली आहे. इंधन दरवाढीचे न पेळणारे ओझे केंद्र सरकारने जनतेवर लादून देशातील १३० कोटी जनतेवर अन्याय केलेला आहे . काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यानी ही दरवाढ केंद्र सरकारने मागे द्यावी म्हणून सरकारला विनंती केलेली आहे. सदर इंधनवाढ मागे घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने देशव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा काँग्रेसकडूनही जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी धरणे धरलेले आहे. आपल्या मार्फत आम्ही राष्ट्रपती याना निवेदन देऊन इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची विनंती करित आहोत, असं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे..