Mumbai, 8 July : आज पाकिस्तान मध्ये पेट्रोल ५८ रुपये प्रति लिटर, नेपाळमध्ये ५६ रुपये, तर बांग्लादेशमध्ये ५८ रुपये प्रति लिटर या दराने मिळत असताना भारतातच पेट्रोल १०६ रुपये प्रति लिटर का? हे पैसे केंद्रातील मोदी सरकार कोणाच्या घशात घालते? हे पैसे मै न खाऊंगा न खाने दूंगा अशी वल्गना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील भाजप सरकारच्या घशात जातात. हे तेच नरेंद्र मोदी आहेत जे भाजप ची सत्ता येण्यापूर्वी मागील सत्तर वर्षे काँग्रेसने काय केले, असा प्रश्न विचारायचे. मी म्हणतो, मागील ७ वर्षांत भाजपने जे काम केले त्याचे दुष्परिणाम समोर आहेत, जे देशातील सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. पेट्रोल डिझेल चे दर जेव्हा वाढतात, त्यावेळेस महागाई सुद्धा वाढते आणि या वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य गरीब जनतेला बसते. पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसचे दर वाढवून देशातील सर्वसामान्य नागरिकांचे रक्त पिणे बंद करा, अन्यथा देशातील जनता गप्प बसणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदी सरकारला दिला. आज पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस दरवाढ आणि वाढत्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. आजसुद्धा मुंबईतील २२७ वॉर्डांपैकी अनेक वॉर्डांमध्ये मुंबई काँग्रेसने निषेध आंदोलन केले. त्यातील उत्तर मुंबईतील बोरिवली विधानसभा क्षेत्र, दक्षिण मध्य मुंबईतील धारावी विधानसभा क्षेत्र व आझाद मैदान जवळील मुंबई काँग्रेस कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा सहभागी झाले होते, त्यावेळेस भाई जगताप बोलत होते. भाई जगताप पुढे म्हणाले की, पेट्रोल डिझेल चे दर जेव्हा वाढतात. त्यावेळेस महागाई सुद्धा वाढते आणि या वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य गरीब जनतेला बसते. २०१४ मध्ये भारतात पेट्रोलचे दर ६८ रुपये प्रति लिटर असताना उद्विग्न होऊन ट्विटर वर स्वतःची गाडी जाळण्याची भाषा करणारे अमिताभ बच्चन आणि जनतेला स्वतःची गाडी विकून सायकल वापरण्याचा सल्ला देणारे अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांसारखे बॉलिवूड आज कुठे आहेत? आज पेट्रोल चा दर १०६ रुपये प्रति लिटर इतका भरमसाठ वाढलेला असताना हे कलाकार मूग गिळून गप्प का बसले आहेत? यांनी स्वतः गाडी वापरणे बंद केले की वाढलेले पेट्रोल व डिझेल चे दर यांना दिसत नाहीत? याचे उत्तर त्यांनी द्यावे.
या आंदोलनामध्ये भाई जगताप व चरणसिंग सप्रा यांच्या समवेत, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, उपाध्यक्ष झिया उर रहमान, नगरसेविका आफरीन शेख, जिल्हाध्यक्ष हुकुमराज मेहता व प्रमोद मांद्रेकर, मुंबई काँग्रेसचे कुणाल माने, मुंबई काँग्रेसचे सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.















