मुंबई : भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलुंड पश्चिमेकडील मेहुल सर्कल जवळ अनोख्या पद्धतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागप्रमुख राजेश चव्हाण यांच्या मार्गदशनाखाली क्रार्यक्रम घेण्यात आला. या सोहळ्यासाठी कारगिल वीर भूमीची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. भारतीय सैनिक आणि त्यांचे देशासाठी असलेले योगदान ही भारतीयांसाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट ठरते. यालाच अनुसरून प्रतिकृती तयार करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ठिकाणी अमर जवान स्मारक देखील उभारण्यात आले होते. यावेळी मेजर अनिता पदमन आणि नेव्ही कमांडर विलास राऊत, भाई जुवळे, सत्यवान दळवी उपस्थित होते. शहीद कौस्तुभ राणे यांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी शेकडो मुलुंडकरांनी एकत्र येत राष्ट्रगीताचे गायन केले. मागील वर्षी याच ठिकाणी वाघा बॉर्डरची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.