मुंबई, दि. २३: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे कार्यालय, माझगाव न्यायालय येथे “सुकून” व “चला बोलूया” कौटुंबीक समूपदेशन केंद्राचे उद्घाटन १९ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तसेच प्रलंबित व दाखल पूर्व कौटुंबिक वादाच्या समन्वयक समितीच्या प्रमुख श्रीमती रेवती मोहिते डेरे यांच्याहस्ते पार पडले.
यावेळी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव एम. एस. आझमी, मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रधान न्यायाधीश नगर दिवाणी व सत्र न्यायालय अनिल सुब्रमण्यम, सुकून टाटा सामाजिक संस्थेचे प्रकल्प सह-संचालक श्रीमती अपर्णा जोशी, दिवाणी व सत्र न्यायालय वकिल संघ अध्यक्ष ॲड रवि जाधव, दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायीक अधिकारी, माझगाव विभागातील विविध पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते – डेरे म्हणाल्या, पोलिस यंत्रणा यांनी सदर कौटुंबीक समूपदेशन केंद्राचा उपयोग करावा. त्यामुळे न्याययंत्रणा व पोलिस यंत्रणावरील ताण कमी होण्यास मदत होणार असून सर्व पक्षकारांना लाभ होईल. सदस्य सचिव आझमी व श्रीमती जोशी यांनी केंद्राच्या कामकाजाबदल मार्गदर्शन केले. प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी आभार मानले.
हे केंद प्रत्येक गुरुवारी व शुक्रवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, १३ वा मजला, माझगाव इमारत, सरदार बलवंत सिंग धोडी मार्ग, नेसबिट रोड, माझगाव मुंबई-४०००१० येथे कार्यरत असणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीकरीता मोबाईल क ८५९१९०३६०१ अथवा इमेल dlsamumbai20@gmail.com. वर संर्पक साधावा, असे आवाहन सचिव अनंत देशमुख यांनी कार्यक्रम दरम्यान केले.
0000