मुंबई, विशेष प्रतिनिधी ः कोरोना विषाणूविरोधी लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी शुभारंभ वांद्रे-कुर्ला संकुलात भव्य कोविड सुविधा केंद्रात (बीकेसी जम्बो कोविड सेंटर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला. त्यानंतर दुपारी उशिरापर्यंत मुंबई महानगरपालिकेचे ९ आणि राज्य शासनाचे एक अशा एकूण १० केंद्रांवर मिळून आज पहिल्या दिवशी १ हजार ९२६ जणांना लस देण्यात आली.
विलेपार्ले येथील मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात, देशव्यापी लसीकरण शुभारंभाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य माध्यमातून लसीकरणाचा प्रारंभ आज सकाळी १०.३० वाजता केला. यावेळी राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ. रामास्वामी, सहायक संचालक डॉ. पाडवी, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. कंथारिया, डॉ. परदेशी, महानगरपालिकेचे उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर, उपकार्यकारी आरोग्याधिकारी डॉ. दक्षा शाह, नोडल ऑफिसर डॉ. संजय पांचाळ, डॉ. अनिता शेनॉय, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश कुंभारे, इतर सहकारी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
केंद्रनिहाय लसीकरण
आज पहिल्या दिवशी लसीकरणाचा शुभारंभ झाल्यानंतर सर्व केद्रांवर लसीकरणाची कार्यवाही सुरु करण्यात आली. दुपारी उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात २४३, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात १८८, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयात १९०, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात २६२, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात १४९, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी ८०, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालयात २८९, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात २६६ आणि बीकेसी भव्य कोविड सुविधा केंद्रात २२० तर जेजे रुग्णालयात ३९ जणांना लस देण्यात आली होती.
सर्वप्रथम लस देण्यात आलेल्यांची केंद्रनिहाय नांवेः
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पहिल्या टप्प्यात एकूण ९ लसीकरण केंद्रे नेमण्यात आली आहेत. या केंद्रांवर आज लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. केंद्रनिहाय सर्वप्रथम लस देण्यात आलेल्या आरोग्य अधिकारी-कर्मचाऱयांची नांवे पुढीलप्रमाणे आहेत. परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात उप अधिष्ठाता डॉ. मिलिंद नाडकर, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयात अधिष्ठाता तथा महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कारंथ, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात मालाड पी/उत्तर विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) डॉ. ऋजूता बारस्कर आणि बीकेसी भव्य कोविड सुविधा केंद्रात आहारतज्ज्ञ मधुरा पाटील यांना सर्वप्रथम लस देण्यात आली.
मुंबईत महानगरपालिकेच्यावतीने एकूण ९ लसीकरण केंद्रांवर मिळून ४० लसीकरण बूथ कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर राज्य शासनाच्या वतीने जे. जे. रुग्णालय हे एक केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड १९ आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचे सुमारे १ लाख ३९ हजार ५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार ३ टप्प्यात मान्यताप्राप्त लसींचे लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यात आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी, उदाहरणार्थ जसे की स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आणि तिसऱया टप्प्यात ५० वर्षावरील सर्व नागरिक तसेच ५० वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या व दुसऱया टप्प्यासाठी केंद्रशासनाने को विन हा डिजिटल मंच विकसित केला आहे. त्या माध्यमातून पहिल्या व दुसऱया टप्प्यातील लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.