मुंबई, ९ मे : कोसळणारी अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी जगातील विविध देश उत्पादन पुन्हा सुरू करत आहेत. जगातील काही भागांत महामारीचा प्रभाव कमी होत असल्यामुळे बेरोजगारीची मोठी लाट आणि त्यानंतर येणारा ताण हळू हळू कमी होत आहे. त्यामुळे सोने, तांबे आणि बेस मेटल यासारख्या वस्तूंना अनुकूल स्थिती असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले. मात्र गेल्या आठवड्यात नफ्यात आलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती आज दबावाखाली आल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्पॉट गोल्डच्या किंमती गुरुवारी १.९० टक्क्यांनी वाढल्या. त्या १७१७.७ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे अनेक सोन्याच्या रिफायनरीज आज पुन्हा सुरू झाल्या. यामुळे बाजाराच्या अपेक्षा वाढल्या आणि सोन्याच्या किंमतींवर परिणाम झाला. डॉलरची किंमत वाढत असल्यामुळे इतर चलनधारकांना सोने खरेदी टाळावी लागू शकते. यामुळे किंमतींवर दबाव येऊ शकतो. स्पॉट सिल्व्हरच्या किंमती ३.८ टक्क्यांनी वाढून १५.५ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवर किंमती ३.०५ टक्क्यांनी वाढून ४३,१२३ रुपये प्रति किलोवर बंद झाल्या.
चीनच्या व्यापारी आकडेवारीने औद्योगिक धातूंच्या मागणीत मोठी शक्यता असल्याचे दर्शविल्याने लंडन मेटल एक्सचेंजमध्ये बेस मेटलच्या किंमती वाढल्या. चीनमध्ये कच्च्या तेलाच्या तसेच तांबे, कोळसा आणि लोह खनिजांच्या आयातीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जगातील दुस-या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत कच्च्या तेलाची मागणी आणि कमोडिटीजच्या किंमतीत सुधारणा होण्याची शक्यता दिसते आहे. लंडन मेटल एक्सचेंजमध्ये तांब्याच्या किंमती १.४६ टक्क्यांनी वाढल्या. कारण शांघाय एक्सचेंजमध्ये तांब्याच्या किंमती वेगाने वाढत असल्याने लाल धातूंच्या किंमती वाढण्यास मदत झाली. पेरुच्या खाणीत उत्पादन वाढल्याने तांब्याच्या दरात वाढ होऊ शकते.
कच्च्या तेलाच्या किंमती १.३ टक्क्यांनी घसरल्या व २३.६ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाल्या. चिनी प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्याचा आरोप अमेरिकेने केला असून यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीसारखी स्थिती निर्माण झाल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. या प्रकारांमुळे अनिश्चितता वाढून कच्च्या तेलाच्या किंमतींवर परिणाम झाला.
सौदीने कच्च्या तेलाची अधिकृत विक्री किंमत (OSP) वाढवली. मे महिन्यात सौदीने कच्च्या तेलाची निर्यात कपातीमुळे किंमतींना थोडा आधार मिळाला होता. लॉकडाउनच्या उपाययोजनांमध्ये रस्ते आणि हवाई वाहतूक कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमतींना मोठा फटका बसला. अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे कच्च्या तेलाच्या किंमतींवर महत्त्वाचा परिणाम होतो.