
डोंबिवली : डोंबिवलीत जिमखान्याच्या रोडवर गेली तीस वर्षे ‘जननी आशिष’ ही अनाथ मुलांचा सांभाळ करणारी संस्था असून या ठिकाणी सुमारे 30 ते 35 मुले रहात आहेत. मात्र बाजूलाच संस्था चालकांना विश्वासात न घेता बांधकाम व्यावसायिकाने संस्थेची भिंत तोडली. यामुळे लहान मुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
डोंबिवलीत 1998 साली 25 महिलांनी एकत्र येऊन ‘जननी आशिष संस्था स्थापन केली. आतापर्यत या संस्थेतून सुमारे 400 पेक्षा जास्त मुलांना दत्तक देण्यात आले आहे. जननी आशिष संस्थेला लागूनच एक बांधकाम सुरू असून यासाठी संस्थेला न विचारताच सुरक्षा भिंत तोडण्यात आली. भिंत तोडल्यामुळे रस्त्यावरचे पाणी संस्थेच्या आवारात जमा झाले व आवाराला तलावाचे स्वरुप आले. संस्था चालक यामुळे अवाक झाले. त्यानी पहाणी केली असता मुख्य कल्याण रोडच्या बाजूने बांधकाम व्यावसायिकाने संस्थेची भिंत तोडल्याचे दिसून आले. यामुळे संस्थेतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संस्था चालक सर्व महिला असून कुंपणाची भिंत नसल्याने मुले संस्थेबाहेर जाण्याचा धोका आहे. या संदर्भात संस्थेच्या अध्यक्षा डॉ. किर्तीदा प्रधान यांना विचारले असता त्यानीही याबद्दल तीव्र नाराजी दर्शवली व बांधकाम व्यावसायिकाला वांरवार कुंपणाची भिंत येाग्य प्रकारे बांधण्यासंदर्भात विंनती केल्याचे सांगीतले. तर बांधकाम व्यावसायिक विनय कलानी यांना विचारले असता त्यानी एम.आय.डी.सी.ने बांधकाम परवाना दिला त्याप्रमाणे सर्व काम केले असल्याचे सांगून संस्थेच्या कुंपणालगतच पाण्याची टाकी बांधकाम करायचे असल्याने भिंत तोडली ती मी बांधून देण्यास तयार असल्याचे त्यानी सांगीतले.















