मुंबई दि 10 : मालाड मालवणी येथे काल रात्री इमारत कोसळून 11 जण मृत्युमुखी तर 8 जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदतकार्याचा आढावा घेतला.
मुंबई शहरचे पालकमंत्री श्री. शेख यांनी काल रात्रीच मदतकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर आज दुपारी श्री. शेख यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून दुर्घटनाग्रस्त इमारतीतील निवासी तसेच स्थानिकांशी संवाद साधला. या दुर्घटनेबद्दल श्री. शेख यांनी तीव्र शोक व्यक्त केला. यावेळी त्यांनी जखमी रहिवाशांच्या परिजनांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर व पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री अस्लम शेख यांनी काल रात्रीच पालिका आयुक्तांशी चर्चा केली व मदत तसेच बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते.