रत्नागिरी, (आरकेजी) : बालदिनाचे औचित्य साधत मुलांना ऑनलाइन जगातून बाहेर काढत रविवारी इंडियन मेडिकल असोसिएशन च्या वतीने मिनी मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. त्याला रत्नागिरीतील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत प्रतिसाद दिला.
‘निरामय आरोग्य सर्वांसाठी’ या संकल्पनेतंर्गत या मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ६ ते १६ वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. रविवार हा सुट्टीचा दिवस आणि बाहेर थंडी पडली असतानाही रत्नागिरी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी भल्या पहाटे ६.३० वाजता थिबा पॅलेस येथील आकाशवाणी जवळ जमा झाले होते. त्यांचे वयोगटानुसार वर्गीकरण करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी नारळ वाढवून या मिनी मॅरेथॉन चे उदघाटन केले आणि झेंडा दाखवून मुलांना मार्गस्थ केले.
ही स्पर्धा मारुती मंदिर येथे संपली. तेथे प्रत्येक गटातून पाहिले तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. त्यामध्ये ६ ते १० वयोगटामध्ये सार्थ समीर कार्लेकर, अमन नवीन मांगा आणि नील संदीप पावसकर हे अनुक्रमे पहिले तीन क्रमांकाने विजयी झाले. तर रिया स्वरूप पाडळकर आणि त्रिशा सचिन मयेकर याना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. ११ ते १३ वयोगटामध्ये धनराज विकास चव्हाण, समर्था सतीश बने आणि मृणाल मंगेश सनगरे हे अनुक्रमे पहिले तिघेजण विजयी झाले. तर सार्थ मोगरकर ला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. १४ ते १६ वयोगटामध्ये सार्थ चव्हाण, मोहम्मद शेख, यश चव्हाण हे पहिल्या तीन क्रमांकाने विजयी झाले तर सोनल गोरे हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. डॉ. ए. डी. परकार, डॉ. शाश्वत शेरे, डॉ. शेवाळे आणि आय एम ए चे अध्यक्ष डॉ. निलेश शिंदे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करणयात आले. या उपक्रमासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन चे सर्व सदस्य डॉक्टर्स उपस्थित होते.