रत्नागिरी : यापूर्वी तीन वेळा रद्द झालेली प्रस्तावित आयलॉग बंदर प्रकल्पाची जनसुनावणी आज प्रशासनाने अखेर रेटून नेली. विरोधाच्या घोषणा, हजारो नागरिकांची गर्दी अशा प्रचंड गदारोळात मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही जनसुनावणी झाली.
राजापूर तालुक्यातील आंबोळगड, नाटे येथे आयलॉग पोर्ट कंपनीचा बंदर प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला परिसरातील मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे. या पूर्वी तीन वेळा या प्रकल्पाची पर्यावरणीय जनसुनावणी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे आजच्या जनसुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.
दरम्यान ही जनसुनावणी रद्द करण्यात यावी असं पत्र स्थानिक आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत यांनी प्रशासनाला दिलं होतं. आणि विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही ही जनसुनावणी रद्द करण्यात यावी असं पत्र जिल्हाधिकार्यांना दिलं होतं, मात्र त्यांच्याही पत्राला केराची टोपली दाखवत आज जिल्हा प्रशासनाने ही जनसुनावणी घेतली.
सकाळी 9 वाजल्यापासून नाटे इथं जनसुनावणीला मच्छिमार, स्थानिक, महिला लोकप्रतिनिधी यांनी मोठी गर्दी केली होती.. सरकार आणि आयलॉग कंपनी विरोधात जोरदार यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. एकच जिद्द आयलॉग रद्द, रद्द करा रद्द करा जनसुनावणी रद्द करा, समुद्र आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, आयलॉग गो बॅंक अशा घोषणांनी परीसर दुमदुमून गेला होता.. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व्यासपीठावर आल्यानंतर 11 वाजता जनसुनावणीला सुरुवात झाली. यावेळी नागेश लोहळककर(प्रादेशिक अधिकारी तथा सदस्य, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर), इंदिरा गायकवाड-उपप्रादेशिक अधिकारी), राजापूर प्रांत अजय करगुटकर, तहसीलदार प्रतिभा वराळे उपस्थित होते.
यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. स्थानिकांमध्ये शिवसेना आमदार राजन साळवी, काँग्रेसच्या आमदार हुस्नबानो खलिफे, राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते, मच्छिमार नेते अमजद बोरकर, सत्यजित चव्हाण, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. जनसुनावणीच रद्द करावी अशी मागणी यावेळी उपस्थितांना केली. दरम्यान शांत राहून आपलं म्हणणं मांडावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. मात्र विरोधाच्या घोषणा काही थांबत नव्हत्या. अशातच आयलॉग कंपनीचे उपाध्यक्ष राजकुमार येवलेकर यांनी प्रकल्पाचं सादरीकरण केलं. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी चार वेळा नागरिकांना आपलं म्हणणं मांडण्याचं आवाहन केलं. गोंधळ थांबवावा आणि आपलं म्हणणं मांडावं नाहीतर माझा एकतर्फी अहवाल जाईल असा थेट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.. त्यामुळे गोंधळ आणखीणच वाढला. त्यानंतर शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी ही जनसुनावणी संपन्न झाली असं जाहीर केलं. प्रचंड विरोध असतानाही ही जनसुनावणी प्रशासनाने अखेर रेटून नेली.
जिल्हाधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार – राजन साळवी
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या आदेशाला न जुमानता जिल्हाधिकाऱ्यांनी ही जनसुनावणी घेतली, त्यामुळे त्यांच्याविरोधात येत्या अधिवेशनात हक्कभंग मांडणार तसेच अशा जिल्हाधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी अशी शिफारस आपण पर्यावरण मंत्र्यांकडे करणार असल्याचं साळवी यांनी यावेळी सांगितलं..
मोठा पोलीस बंदोबस्त
या जनसुनावणीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, दोन पोलीस उपविभागीय अधिकारी, आठ पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस असा एकूण जवळपास अडीचशे पोलीस फौजफाटा तैनात होता.. त्यामुळे परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं..