
नवी दिल्ली : पर्यटन व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टूरीझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट अर्थात आयआयटीटीएम या अग्रगण्य संस्थेची शाखा सिंधुदर्ग-मालवण येथे सुरू होणार आहे. याबाबत केंद्रीय वाणिज्य, उद्योग व नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) के. अल्फोन्स यांनी नुकतेच पत्र पाठविले आहे. या निर्णयाबद्दल एका पत्राद्वारे अल्फोन्स यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
प्रभू यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, 700 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेल्या कोकण विभागामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल वातावरण आहे. रम्य निसर्ग व सागरी किनाऱ्यांमुळे कोकणात कायम देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी असते. गोव्यातही समुद्र किनारा आहे. मात्र पर्यटनाच्या वाढत्या क्षमता पूर्ण करण्यास गोवा आता मदत करू शकणार नाही अशी परिस्थिती दिसते. अशा काळात सिंधुदुर्ग-मालवण भागात आयआयटीटीएमची शाखा सुरू झाल्याने स्थानिक तरूणांना पर्यटन व्यवस्थापनाचे शास्त्रशुध्द शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे आतापर्यंत आर्थिकदृष्ट्या अविकसित राहिलेल्या कोकण पट्ट्यात पर्यटन व्यवसायास चालना तर मिळेलच पण या भागाच्या सर्वंकष आर्थिक प्रगतीसाठीही ही संस्था मदतशीर ठरेल असा विश्वास प्रभू यांनी आपल्या पत्रात व्यक्त केला आहे.
रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यIतील सोयीच्या जागी ही संस्था उभारण्यात यावी असे सांगतानाच प्रस्तावित आयआयटीटीएम संस्थेत अर्धवेळ नव्हे तर पूर्णवेळ अभ्यासक्रमांची सुविधा असावी अशी आग्रहाची विनंती प्रभू यांनी पर्यटन मंत्र्यांना केली. या संस्थेला जागा देण्याबाबत आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विनंती केली असल्याचे त्यांनी नमूद केले
















