
मुंबई, दि. 30 (प्रतिनिधी) – कामराज नगर मधील एमएमआरडीए व एसआरए यांचा संयुक्त प्रकल्प ८ महिन्यानंतरही सुरु न झाल्याने स्थानिक रहिवाश्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या विरोधात कामराज नगर येथे शिवसेना (उबाठा) पक्षाच्यावतिने शनिवारी 27 सप्टेंबर रोजी जोरदार आंदोलन करण्यात आले. युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले.
एमएमआरडीए व एसआरए यांचा संयुक्त प्रकल्प कामराज नगर येथे राबविण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत १६ हजार कुटुंब विस्थापीत होणार आहेत. हा प्रकल्प सुरु होण्यापुर्वी कामराज नगर मधील ३ हजार सहाशे घरे तोडण्यात आली तर दोनशे घरे अपात्र ठरविण्यात आली. घरे तोडताना एमएमआरडीए व एसआरएच्यावतिने स्थानिक रहिवाश्यांना आश्वासन देण्यात आले होते की दोन महिन्यात कामाला सुरवात होईल. मात्र आठ महिने झाले तरी या प्रकल्पाला सुरवात झाली नाही. त्यामुळे संतापलेल्या रहिवाश्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या मदतीने जोरदार आंदोलन केले. विभाग प्रमुख सुरेश पाटील व युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. एमएमआरडीए व एसआरए यांनी नागरीकांना आश्वासन दिले होते त्याची पुर्तता करण्यात यावी व या प्रकल्पाला तात्काळ सुरवात करावी, अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी दिला आहे.
एमएमआरडीए व एसआरए यांनी तातडीने कामाला सुरुवात करावी. गेले आठ महिने काम सुरु होईल या अपेक्षेने स्थानिक नागरीकांनी संयम ठेवला आहे. मात्र त्यांच्या संयमाचा अतिरेकपणा करु नये. अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल. त्याची सर्व जबाबदारी एमएमआरडीए व एसआरए यांची असेल.– खासदार संजय दिना पाटील















