
जिल्ह्यातील पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) मंत्री झिरवळ यांची संपर्कमंत्री म्हणून केली नियुक्ती
Nagar : राज्यात महायुती सरकार टिकले, तर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू राहील, अन्यथा गडबड होईल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज, सोमवारी नगरमध्ये बोलताना दिला. नंतर त्यांनी सरकारला कोणती अडचण नाही, पण पुढे जाऊन नवीन सरकार हा निर्णय बदलू शकते, अशी पुस्ती त्यांनी पत्रकारांशी बोलताना जोडली.
जिल्ह्यातील पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) मंत्री झिरवळ यांची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी आज नगरमध्ये आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, ज्येष्ठ नेते अरुण तनपुरे, घनश्याम शेलार, संजय कोळगे, संपत बारस्कर, दत्ता पानसरे तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचे वरिष्ठ पातळीवरून संकेत दिले गेले आहेत. त्यासाठी तिन्ही पक्षांच्या सहा जणांची समिती स्थापन केली आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पालिका निवडणुकीमधील सर्व जागांवर अर्ज भरून ठेवले जाणार आहेत. पक्षाचा आदेश येईल, तसा पुढील निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री झिरवळ यांनी स्पष्ट केले. पक्षाकडे उमेदवारी मागितल्यानंतर ऐनवेळेला दुसरीकडे जाणारे यशस्वी होत नाहीत, स्वार्थासाठी दगा देणाऱ्यांची फजिती होते, असा इशारा देत त्यांनी, आज ना उद्या संधी मिळेल, यासाठी थांबावे लागले तर नाउमेद होऊ नये, असा सल्लाही दिला.
राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सध्या ढासळलेली असली, तरी अनेक चांगले निर्णयही सरकारने घेतले आहेत. ते लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले














