
मुंबई । माझ्याकडे येणाऱ्या पेशंटपैकी अनेकजण सामान्यपणे खोकला, ताप यांचे असतात. पण सध्या, कोरोना झाला, अशी भीती त्यांना सतावते. ही भीती घालवण्यासाठी डॉक्टरचीच गरज आहे. हाच विचार करून मी दररोज कामोठेहून वडाळा येथे बसने क्लिनिकला येतो, असे कोरबा मिठागर येथे झोपडपट्टीत रुग्णसेवा करणारे 62 वर्षीय डॉक्टर अरुण मोहिते सांगत होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आता माझी जबाबदारी अधिक वाढलीय, असेही ते म्हणाले.
लॉक डाऊन काळात रुग्णसेवा, समाजसेवा कशी करावी. हे दररोज नवी मुंबईतील कामोठे ते मुंबईतील वडाळा असा प्रवास करून दवाखाना गाठून डॉ. अरुण मोहिते यांनी दाखवून दिले आहे.
देशात लॉक डाऊन आहे. या काळात अनेक डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले होते. यावरून मोठा वाद देखील झाला होता. माझेही क्लिनिक बंद होते. अचानक लॉक डाऊन झाल्याने वडाळा येथे जायचे कसे हे समजत नव्हते. त्या काळातही मी माझ्या रुग्णाना फोनवरून सल्ले देत होतो. अत्यावश्यक कामांसाठी बससेवा असल्याने क्लिनिकला जायचेच, असे ठरविले.

आता दररोज दोन तास प्रवास करतो. बसने दादरला येतो. त्यानंतर दुसरी बस पकडून क्लिनिकवर पोहोचतो. संध्याकाळी साडेपाच ते साडेआठ या काळात दवाखाना सुरू ठेवतो, असे मोहिते यांनी सांगितले. माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. असे मोहिते म्हणाले.
कोरोनाची लोकांमध्ये प्रचंड भीती आहे. खोकला, ताप आला की कोरोना झाला, अशी भीती त्यांना असते. त्यांची भीती घालवण्यासाठी डॉक्टरचीच गरज आहे, असे मोहिते पुन्हा म्हणाले.















