रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी (ता़३०) दु़१ वा़ जाहीर झाला. यावर्षी राज्यातील ९ विभागीय मंडळामध्ये कोकण मंडळाचा सर्वाधिक ९४.८५ टक्के निकाल लागला. कोकण मंडळाने सलग ७ व्या वर्षी राज्यात अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे़ या मंडळात यावर्षीदेखील मुलांच्या तुलनेने मुलींनी बाजी मारली आहे़ दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९६ टक्के एवढा लागला असल्याची माहिती कोकण विभागीय मंडळाच्या सहसचिव भावना राजनोर यांनी पत्रकार परिषदेत दिली़ यावेळी विभागीय उपसंचालक कोल्हापूरचे प्रतिनिधी तथा रत्नागिरी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर उपस्थित होते़ फेबु्रवारी-मार्च २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फ त आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला़ कोकण विभागीय मंडळाचा एकूण निकाल ९४.८५ टक्के एवढा लागला़ या परीक्षेसाठी कोकण मंडळामध्ये एकूण ३३ हजार ३९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते़ त्यापैकी ३१ हजार ३३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ एकूण १६ हजार ९७९ मुले, तर १६ हजार ६० मुली प्रविष्ठ झाल्या होत्या़ मुलांची उत्तीर्णतेची संख्या १५ हजार ७३७ असून, त्यांचे शेकडा प्रमाण ९२.६९ टक्के आहे़ मुलींची उत्तीर्णतेची संख्या १५ हजार ५९९ असून, त्यांचे शेकडा प्रमाण ९७.१३ टक्के आहे़ मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने ४.४४ टक्के इतके आहे़ कोकण विभागीय मंडळाच्या प्रमुख विषयांच्या निकालामध्ये रसायनशास्त्राचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९.४५ टक्के एवढा लागला असून, त्याखालोखाल मराठी ९९.३५ टक्के, जीवशास्त्र ९९.२६ टक्के, भौतिक शास्त्र ९८.७३ टक्के, हिंदी ९८.४८ टक्के, अकौटन्सी ९८.३२ टक्के, अर्थशास्त्र ९७.४८ टक्के, गणित ९७.३५ टक्के तर सर्वाधिक कमी म्हणजेच ९५.२० टक्के निकाल इंग्रजी विषयाचा लागला आहे़ सिंधुदुर्ग जिल्ह्याने यावर्षी ९६ टक्के निकाल देऊन, राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे़ या जिल्ह्यात एकूण ११ हजार ६१९ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते़ त्यापैकी ११ हजार १५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ यामध्ये ५ हजार ५३० मुले, तर ५ हजार ६२४ मुलींचा समावेश आहे़ मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.८४ टक्के असून, मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.१९ टक्के आहे़ या जिल्ह्यात एकूण ९६ कनिष्ठ महाविद्यालय असून, २३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती़ रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला असून, जिल्ह्यातून एकूण २१ हजार ४२० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते़ त्यापैकी २० हजार १८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ यामध्ये १० हजार २०७ मुले, तर ९ हजार ९७५ मुलींचा समावेश आहे़ मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.७३ टक्के असून, मुलांची ९१.८९ टक्के एवढी आहे़ निकालाच्या ठळक वैशिष्ट्यांबाबत बोलताना सहसचिव भावना राजनोर यांनी सांगितले की, यावर्षी दुर्गम व डोंगराळ भागातील विद्याथ्र्यांना नजीकचे केंद्र मिळण्याच्या उद्देशाने दोन नवीन केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती़ कॉपीमुक्त अभियानाकरिता जिल्हास्तरावर सभा आयोजित करून मार्गदर्शन करण्यात आले़ तणावविरहीत व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्याकरिता प्रत्येक शाळेत विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या संयुक्त मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते़ विभागीय मंडळातून दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी ९ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती़ भरारी पथकांना केंद्र भेटीबाबतचे दररोजचे नियोजन देण्यात आले होते़