हरित घर तयार करण्यासाठी नेमके काय करावे लागते, असा विचार तुमच्या मनात कधी आला आहे का? तुमच्या घराच्या भोवती भरपूर हिरवळ लावावी लागते का की तुमच्या घराला वीज पुरवण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा वापरावी लागते की तुमचे घर हाय टेक मशीनवर चालवावे लागते?
सर्वप्रथम, पहिला समज दूर करूया. हरित घर किंवा इमारत उभारणे, हे पारंपरिक घर किंवा इमारत उभारण्यापेक्षा महागडे नसते. आणि त्यातून लवकरच फळ मिळू लागते. दीर्घ काळामध्ये, लक्षणीय बचत होते. त्यामुळे तुम्ही नवे घर शोधत असाल किंवा तुमच्या जुन्या घराचे नूतनीकरण करणार असाल तर तुम्ही हरित घराचा पर्याय निवडावा, असे तुम्हाला आवाहन आहे. हरित घर बांधकामाच्या दरम्यान डिझाइन, ऊर्जा, पाणी व अन्य संसाधने यांचा कार्यक्षमपणे वापर करण्यावर भर देते आणि असे करण्याचा परिणाम म्हणजे – असे घर चालवण्यासाठी आयुष्यभर कमी खर्च येतो. उदाहरणार्थ, विजेची बचत करणारे फिटिंग व उपकरणे अनेक पटींनी अधिक फायदे देतात.
हरित घराची काही वैशिष्ट्ये म्हणजे, नैसर्गिक प्रकाश व हवा यांचा जास्तीत जास्त वापर करून या घरांची उत्तम रचना केली जाते. यामुळे उन्हाळ्यात ही घरे थंड राहतात आणि हिवाळ्यात ऊबदार राहतात. यामुळे घरातील रहिवाशांना विजेसाठी कमी खर्च करावा लागतो. यू. एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने केलेल्या अभ्यासानुसार, पारंपरिक इमारतींच्या तुलनेत हरित इमारती 25 ते 30% विजेची बचत करू शकतात. आधुनिक हरित इमारतींमध्ये कॉमन एरियांना वीज पुरवण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला जातो किंवा किमान अपारंपरिक उर्जेचा तरी वापर केला जातो. हरित इमारतींमुळे पाण्यामध्ये वाढ केली जाते आणि भूजलाची पातळी पुन्हा साध्य केली जाते. सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यासाठी आणि उद्यानांनाव मालमत्तेतील लँडस्केप्ड भागांना पाणी पुरवण्यासाठी सांडपाण्यावर पुन्हा प्रक्रियाही केली जाते. पाण्यासाठी वापरलेल्या फिक्शरमुळे पाण्याचा प्रवाह अशा प्रकारे कमी केला जातो की एखादे काम करण्यासाठी पाणी कमी पडत नाही, पण पाण्याचा वापर जपून केला जाईल, याची काळजी घेतली जाते.
घराच्या बांधकामाच्या टप्प्यादरम्यान संरचनेच्या एकात्मितेची दक्षता घेत, पर्यावरणपूरक साहित्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. उद्योगातील उपउत्पादनाचा वापर, ज्या साहित्याचे संपादन व उत्पादन करत असताना पर्यावरणाची हानी केली जाणार नाही अशा साहित्याचा वापर हे वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे काही हरित पैलू आहेत. साहित्यामुळे इमारतीची ऊर्जाबचतीची क्षमताही वाढते. इमारतीमध्ये फ्लोअरिंग, प्लास्टरिंग, रंगकाम आदीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यामुळे घरातील वातावरण अधिक चांगले राहते. यामुळे घरामध्ये नेहमी ताजेतवाने वाटते व आरोग्यदायी वातावरण निर्माण होते.
हरित जागेमध्ये राहण्याबद्दल जागृती वाढते आहे. जे लोक हरित इमारतींमध्ये राहत आहेत त्यांना या तंत्रज्ञानाचे फायदे अनुभवता येत आहेत. भारतातील दोन-तृतियांश इमारत पायाभूत सुविधा अद्याप यामध्ये समाविष्ट व्हायचे आहे. हरित इमारतींसाठी मागणी वाढली तर पुरवठाही वाढेल आणि विजेच्या बचतीमुळे देशातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठे योगदान दिले जाईल. हरित बांधकामाला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना अमलात आणून या प्रयत्नांमध्ये हातभार लावते आहे. त्यातील काही योजना आहेत:
पूर्व-प्रमाणित ग्रिह (ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेड हॅबिटॅट असेसमेंट) प्रकल्पांना जलद गतीने पर्यावरणीय मंजुरी देण्याबाबत पर्यावरण व वन मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे.
नोएडा व ग्रेटर नोएडा येथील प्रकल्पांनी (5,000 चौरस मीटर व त्याहून अधिक क्षेत्रावरील) 4 किंवा 5-स्टार ग्रिह रेटिंगशी अनुपालन साधल्यास त्यांना अतिरिक्त 5% मोफत फ्लोअर एरिया रेश्यो (एफएआर) मिळू शकतो.
याचप्रमाणे, जयपूर डेव्हलपमेंट अथॉरिटीने सूचित केले आहे की, 5,000 चौरस मीटर क्षेत्रापेक्षा मोठ्या प्लॉटवर बांधलेल्या इमारतींना ग्रिहकडून 4 किंवा 5-स्टार रेटिंग मिळाल्यास त्यांना अतिरिक्त 5% मोफत एफएआर मिळेल.
महाराष्ट्रात, पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित इमारतींसाठी मालमत्ता करावर 15% पर्यंत आणि आपले प्रकल्प ग्रिह-प्रमाणित केलेल्या बिल्डरना प्रिमिअमवर 50% पर्यंत सवलत जाहीर केली आहे.
कोलकाता महापालिकेच्या परिपत्रकानुसार, पश्चिम बंगाल हरित इमारतींसाठी 10% अतिरिक्त FAR देते.
चांगली बातमी म्हणजे, जुन्या इमारती हरित करण्यासाठी त्यांच्यामध्ये बदल करता येऊ शकतात. वॉटर हार्नेसिंग, एलईडी लायटिंग फिटिंग, कचरा विभाजन, ऑरगॅनिक वेस्ट कम्पोस्टिंग, स्टार-रेटेड उपकरणांचा वापर, ऊर्जाक्षमतेसाठी छपरावर प्रक्रिया, अपारंपरिक ऊर्जेचे संपादन किंवा अवलंब, असे उपाय केल्यास जुन्या इमारतीही आत्ता आहेत त्यापेक्षा अधिक हरित करता येऊ शकतात आणि त्यांचे कार्बन उत्सर्जन व खर्च कमी करता येऊ शकतो.
हरित इमारतींची चळवळ चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येत आहे. सर्वांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावे आणि गृह पायाभूत सुविधांच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वाधिक हरित देश बनण्यासाठी योगदान द्यावे.