मुंबई : लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. अत्यावश्यक सेवा वगळता वाहनांची ये-जा नसल्याने प्रदूषणही कमी होत आहे. हवेची गुणवत्ता सुधारत आहे. कोरोनाच्या भितीमुळे नागरिक घरात बसून आहेत. तर, प्राणी-पक्षी रस्त्यावर मुक्तपणे संचार करत आहेत. याबाबतच्या बातम्या आणि छायाचित्रेही प्रसिद्ध झाली आहेत. यावर भाष्य करणारे एक चित्र विक्रोळीतील चित्रकार दर्शना गोवेकर यांनी साकारले आहे.
या चित्रात दोन भाग आहेत. पहिला भाग कोरोनापूर्वीचा आहे. ज्यात एक कुटुंब अभयारण्य फिरायला जाते आणि तेथील प्राणी त्यांना दिसतात. तर दुसऱ्या छायाचित्रात जे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरचे आहे. त्यात कोरोनामुळे त्याच कुटुंबाने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. मास्कही लावले आहे. आणि घरातून ते रस्त्यावर पाहत आहेत. त्यावेळी त्यांना अभयारण्यातील प्राणी दिसतात. हे प्राणी त्या कुटुंबाला प्राणिसंग्रहालयात ज्या प्रमाणे माणसे प्राण्यांना पाहतात, त्याप्रमाणे पाहतात. असा देखावा असलेलं चित्र दर्शना यांनी काढले आहे.
कोरोना मानवनिर्मित असल्याचे बोलले जाते. लोकं घाबरले आहेत. आता रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. प्रदूषण कमी झाले आहे. मानवाने प्राण्यांच्या ज्या अधिवासावर अतिक्रमण केले, त्याच अधिवासात प्राणी पुन्हा येत आहेत. पर्यावरणाचा समतोलही राखला जात आहे, यावरून कल्पना करून हे चित्र काढल्याचे दर्शना यांनी सांगितले.