सिंधुदुर्ग : आरोंदा हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. आरोंद्यामध्ये पर्यटनाचा विकास महत्वाचा आहे. त्यासाठीच आरोंद्याच्या खाडीसाठी एक हाऊस बोट देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आरोंदा येथे आयोजित पर्यंटन विषयक कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
यावेळी आरोंद्याच्या सरपंच उमा बुडे, ग्रामपंचायत सदस्य बबन नाईक, तहसिलदार सतीश कदम यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोंद्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे ध्येय असल्याचे सांगून पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले की, आरोद्यांसाठी लवकरच हाप ऑन हाप ऑफ बोटी देणार आहे. तसेच मँग्रोव्ह भोवती मासे पाळण्यासाठी बोर्डवॉक, केज फार्मिंग प्रकल्प, केज फिशिंग या योजना राबविण्यात येणार आहे. 50 टक्के कर्ज व 50 टक्के गुंतवणूकदारांकडील गुंतवणूक या तत्वावर कॉटेज व निवास न्याहरी योजना राबविण्यात येणार आहे. आरोंदा गावामध्ये अनेक जुनी घर आहेत. तसेच खाडी किनारी जमिनी आहेत. या लोकांनी या योजना राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याशिवाय कुक्कुट पालन, शेळी पालन व देशी वंशांच्या गायींच्या पालनासाठी पक्षी व गायी देण्यात येणार आहेत. यातून निर्माण होणारी उत्पादने विक्रीची जबाबदारी ही खाजगी कंपन्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी खाजगी कंपन्यांशी बोलणी झाली आहेत. तसेच हॅपी एग्जच्या उत्पादनासाठी कोंबड्यांचा पुरवठा करणार आहे. या हॅपी एग्ज ना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. स्थानिकांनी फक्त त्यांचे उत्पादन घ्यावे, विक्रीची जबाबदारी ही खाजगी कंपनीकडे असणार आहे. त्यामुळे विक्रीविषयी चिंता करण्याचे कारण नाही. या योजनांसाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले.