मुंबई : शिक्षण क्षेत्रातील गुणसंपन्न कर्मयोगी आणि मुंबईतील ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व कुवेशी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) तालुक्यातील गावचे रहिवासी मधुकर नार्वेकर यांची आज 15 मे रोजी जयंती. त्या निमित्त अध्यक्ष सौ. मनिषा प्रनिल नायर, विद्यालंकार शिक्षण संस्था संस्थेचे सर्व विश्वस्त, सर्व प्राचार्य, कुटुंबीय, कर्मचारी वृंद, पालक, विद्यार्थी व हितचिंतक, विक्रोळीतील नागरिक यांच्या वतीने सरांना विनम्र अभिवादन.
नार्वेकर सरांचा जन्म १९४५ साली कुवेशी या खेडेगावात झाला. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. मात्र पुढे बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठली. विक्रोळीत काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी प्रथम कन्नमवार नगर भाडेकरू संघ स्थापन केला व त्यामार्फत तेथील नळाचे पाणी, पक्के रस्ते ते पोलीस स्टेशन आदी उभारून प्रतिकूल परिस्थिती अनुकूल केली. त्यांच्या परिसरात बालवाडी सुरू करण्यासाठी गृहनिर्माण मंडळाने जाहिरात दिली. मात्र अनामत रक्कम ६३७ रूपये सुध्दा त्यांच्याकडे नव्हते. त्यावेळी या प्रयत्नांना प्रथम पाठिंबा दिला ते नगरसेवक रा. वि. पडवळ यांनी २५० रूपये देऊन त्यांनी त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे नेले. बाळासाहेबांनी कुटुंबाला धीर देत ७५० रूपयांचा धनादेश दिला. अशा रितीने १४ जुलै १९७१ रोजी फक्त सात मुलांना घेऊन नार्वेकर दाम्पत्याने शिक्षणाचा श्रीगणेशा केला. पुढे बालवाडीतून पहिलीच्या वर्गाचा शुभारंभ झाला आणि संस्था रजिस्टर्डही करण्यात आली. १९७६ साली नार्वेकरांना १६०० चौ. फुटाची जागा मिळाली. एक मे १९७६मध्ये ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेचे भूमिपूजन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. सन १९८९ मध्ये त्यांनी अस्मिता कनिष्ठ महिला महाविद्यालयाची मुहुर्तमेढ रोवली. सन १९९१मध्ये अस्मिता वरिष्ठ महिला महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यानंतर या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होताना २००८ साली अस्मिता बीएससी आयटी कॉमर्स, सायन्स तर २००९मध्ये अस्मिता विधी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली.
सरांचा जीवन परिचय :
– कुवेशी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे १५ मे १९४५ रोजी जन्म.
– वयाच्या दहाव्या वर्षी खलाशी गलबताने मुंबईत आगमन.
– सन १९६७ मध्ये विवाहबद्ध. सन १९६९ मध्ये कन्नमवार नगर येथे निवास. कन्नमवार नगर येथे पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा, जनता मार्केट उभारणी
– गणेशोत्सव आणि अन्य सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग. २६ जानेवारी १९७१ मध्ये कन्नमवार नगरमध्ये ॐ विद्यालंकार शिक्षण समिती स्थापना.
– सन १९७५ उत्कर्ष बालमंदिर शाळेची स्थापना.
– शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ७ मे १९७६ रोजी ३० विद्यासंब शिक्षण संस्थेच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ संपन्न.
– सन १९८६ मध्ये संस्थेत गणेशोत्सवाला प्रारंभ.
– सन १९८९ मध्ये अस्मिता कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना.
– सन १९९१ मध्ये अस्मिता वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना.
– मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेची अस्मिता महाविद्यालयातील शाखा सन १९९५ मध्ये सुरू.
– प. पू. स्वामी श्री गगनगिरी महाराज यांचे सन १९९७ मध्ये ॐ विद्यालंकार शिक्षण संस्थेत आगमन आणि सरस्वती देवीची प्राणप्रतिष्ठा.
– सन २००२ मध्ये संस्थेत राष्ट्रीय छात्र सेनेच्या युनिटला सुरूवात. सन २००५ मध्ये एकसष्ठीपूर्ती समारंभ संपन्न.
– सन २००८ मध्ये विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना.
– सन २००९ साली बी.एस्सी. आयटी व कॉम्प्युटर सायन्स आणि अस्मिता विधी महाविद्यालयाची स्थापना.
– संस्थेच्या आवारात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं १५ नोव्हेंबा २००८ रोजी अनावरण.
– सन २०१४ मध्ये अस्मिता महिला महाविद्यालयास नॅक मूल्यांकन प्राप्त.
– सन २०१४ ते २०२१ संस्थेतील सर्व उपक्रमांत हिरीरीने सहभाग.
– २६ जानेवारी २०२१ रोजी ॐ विद्यालंकार शिक्षण संस्थेला ५० वर्षे पूर्ण झाली.