
मालाड , (निसार अली) : रिक्षाचालक अतुल बोर्डे यांनी महिला प्रवासी करिश्मा जैन यांची बॅग व त्यातील सव्वा लाख रुपये व सोनसाखळी बोरिवली पोलीस ठाण्यात जमा केले. बोरिवली ते भाईंदर दरम्यानच्या रिक्षा प्रवासात जैन बॅग विसरल्या होत्या. सोमवार दिनांक 26 जुलै रोजी, करिश्मा जैन या बोरीवलीतून भाईंदर येथे जाण्यासाठी बोर्डे यांची रिक्षा पकडली. उतरताना रिक्षामध्ये त्या बॅग विसरल्या.
स्वत:च्या घराजवळ रिक्षा पार्क करताना बोर्डे यांना बॅग दिसली. त्यांनी तातडीने युनियन कार्यालयात संपर्क करून बॅग बद्दल माहिती दिली. नंतर युनियनच्या पदाधिकार्यांसोबत बोरिवली पोलीस ठाण्यात जाऊन बॅग जमा केली. त्यात सव्वा लाख रुपयांसह सोन साखळी व इतर वस्तू होत्या. प्रवासी महिलेने भाईंदर पोलीस ठाण्यात बॅग विसरल्याची तक्रार दिली होती. मंगळवार दिनांक 17 जुलै रोजी सकाळी करिष्मा जैन यांना पोलिसांनी संपर्क केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण डुबरे यांनी जैन यांना बॅग परत केली. जैन यांना संपर्क करण्यासाठी बोरिवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक विजय जाधव यांनी मेहनत घेतली होती. बॅग मिळाल्यानंतर करिश्मा जैन यांनी अतुल बोर्डे तसेच रिक्षा युनियन आणि पोलिसांचे आभार व्यक्त केले.















