मातृत्वाच्या महानतेसाठी नेहमीच इतिहासातील हिरकणीची गोष्ट सांगितली जाते. रायगड किल्ल्यावरचा एक अवघड बुरुज, काळ्याकभिन्न अंधारात, आपल्या तान्ह्या बाळासाठी उतरून येणाऱ्या या आईचे साहस इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे.
मातृत्वाच्या याच धाडसाची गाथा ’हिरकणी’ या नावाने लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त या सिनेमाची घोषणा करण्यात आली.
ज्येष्ठ लेखक प्रताप गंगावणे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.हिरकणीच्या भूमिकेत कोणती ‘नायिका’ आहे, हे सध्या गुपित ठेवण्यात आले आहे.