मुंबई: हिमालय पादचारी पुल दुर्घटनेत सहा जणांचा बळी गेल्यानंतर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने २४ तासात पाच अभियंते, कंत्राटदार आणि स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये दोन अधिकार्यांच्या निलंबनासह तिघांची खात्यांतर्गत चौकशी, कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस तर पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा देणाऱ्या स्ट्रक्चरल ऑडिटर डी.डी देसाईची शासकीय पॅनलवरून हकालपट्टी करून त्याला काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या आहेत.
पूल दुर्घटनेची जबाबदारी कुणाची याबाबत २४ तासांत अहवाल द्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिल्यानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शुक्रवारी सकाळी अधिका-यांची बैठक घेऊन याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मुख्य अभियंता (दक्षता विभाग) यांना पूल दुर्घटनेची चौकशी करुन येत्या २४ तासात प्राथमिक अहवाल सादर करण्याचा आदेश दिले. मुख्य अभियंता (दक्षता) विवेक मोरे यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना कारवाईचा प्राथमिक अहवाल शुक्रवारी सादर केला.
अशी झाली कारवाई
१) कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील- निलंबन, खात्यांतर्गत चौकशी
२) सहाय्यक अभियंता एस. एफ. काकुळते – निलंबन, खात्यांतर्गत चौकशी
३) प्रमुख अभियंता (पूल) एस. ओ. कोरी (सेवानिवृत्त) – खात्यांतर्गत चौकशी
४) उपप्रमुख अभियंता आर. बी. तरे (सेवानिवृत्त) – खात्यांतर्गत चौकशी
५) प्रमुख अभियंता ए. आय. इंजिनीयर – खात्यांतर्गत चौकशी
६) दोन वर्षांपूर्वी दुरुस्तीचे काम दिलेल्या आर.पी.एस इन्फ्रास्ट्रक्चर ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस, काळ्या यादीत टाकणार.
असा आहे अहवाल
मुंबईतील पुल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पूल विभागाने ३१४ पूलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी डी.डी. देसाईज असोसिएट इंजिनीयरिंग कन्सलटंट अॅण्ड अॅनालेसिसला काम देण्यात आले. या कंत्राटदाराने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार एकूण २९६ ब्रीज, फुटओव्हर ब्रीज आणि रोड ओव्हर ब्रीजपैकी ११० ब्रीज चांगल्या स्थितीत आहेत. त्यांना कोणताही धोका नाही. तर १०७ पुलांची किरकोळ दुरुस्ती तर ६१ पुलांची मोठी दुरुस्ती सुचविण्यात आली होती. त्यामध्ये १८ पूल तोडून पूर्णपणे नव्याने बांधकाम करण्याच्या सुचना सल्लागाराने दिल्या होत्या. सल्लागाराच्या अहवालानुसार मुंबईतील दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतली आहेत. मात्र हिमालय पादचारी पूल मजबूत असल्याचा निर्वाळा दिला होता, असा सल्ला दिल्याचे अहवालात म्हटले आहे.