रत्नागिरी, (आरकेजी) : उधाण भरतीचा किनारपट्टीला तडाखा बसला आहे. रत्नागिरीतील पर्यटनक्षेत्र भाट्ये बीच सुमारे 5 फूटाने खचला आहे तर मिऱया पंधरामाड येथील धुपप्रतिबंधक बंधार्यालाही शनिवारी सकाळी भगदाड पडले.
दोन दिवसांपासून ‘हायटाईड’ मुळे किनारपट्टी लगतच्या मिर्या, पंधरामाड, मांडवी, भाट्ये येथील रहिवाशी भीतीच्या छायेखाली आहेत. मिर्या पंधरामाड किनार्याला शुकवारी उधाणाचा तडाखा बसून धुपपतिबंधक बंधार्याला भगदाडे पडली होती. पण शनिवारीही या उधाणाने येथील किनारपट्टीवर पुन्हा थैमान घातले. शनिवारी सकाळी आलेल्या प्रचंड उधाणामुळे पंधरामाड, अलावा, भाटिमिर्या भागाला तडाखा बसला. पंधरामाड येथील ढासळलेला धूपपतिबंधक बंधार्याला मोठे भगदाड पडले. सुमारे 70 फुटांपेक्षा जास्त लांबीचा बंधाराच वाहून गेला. त्यामुळे तेथील लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. पडलेल्या प्रचंड भगदाडामुळे माडाची झाडे ग्रामस्थांच्या डोळ्यांदेखत समुद्राने गिळंकृत केली.