
रत्नागिरी, (आरकेजी) : अमावास्येनंतरच्या उधाणाचा फटका रत्नागिरी जवळच्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याला बसला आहे. आज किनाऱ्याला जवळपास चार ते पाच मीटर उंचीच्या लाटा धडकत होत्या. लाटांचा हा तडाखा पंधरामाड, मिऱ्या आणि आलावा इथल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी बांधलेल्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याला बसला. गेल्या वर्षी पाऊस आणि त्यावेळी आलेल्या उधाणामुळे इथला बंधाऱ्याचा भाग वाहून गेला होता. जवळपास १३०० मीटर लांबीचा हा बंधारा आहे. गेल्या वर्षीचा अनुभव पाहून वाहून गेलेल्या ठिकाणी मोठ्या आकाराच्या दगडांचा भराव टाकण्यात आला होता. मात्र पाऊस नसताना या लाटांच्या तडाख्यांनी बंधाऱ्याचा काही भाग पुन्हा वाहण्यास सुरुवात झाली आहे. सध्या समुद्राच्या लाटा या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यावरून थेट नागरीवस्तीत घुसू पहात आहेत. त्यामुळे सध्या इथले नागरिकसुद्धा भयभीत झालेत. पंधरामाड परिसरातला धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा काही भाग लाटांच्या माऱ्यामुळे वाहून गेलाय. समुद्राच्या उधाणापासून नागरिकाच्या वस्तीचे रक्षण व्हावे म्हुणन हा बंधारा बांधला गेला होता. सध्या या लाटा बंधाऱ्यावरून उसळून थेट घराला लागून असलेल्या बागेत घुसल्या, त्यामुळे अनेक घरांच्या मागे असलेल्या विहिरीत उधाणाचं पाणी घुसलंय. त्यामुळे सध्या जीव मुठीत धरून इथले ग्रामस्थ रहातायत. रात्रीपासून उधाणाच्या परिस्थितीकडे इथले ग्रामस्थ लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पाऊस वाढला तर उधाणाचा मोठा फटका इथल्या नागरी वस्तीला बसू शकतो.