
रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी जिल्ह्यात 20 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. प्रशासनाकडून जनतेला सावधनाता व सुरक्षितेचा इशारा देण्यात आला आहे.
समुद्राच्या उधाणाने कोकण किनारपट्टीची दाणादाण उडवली आहे. दरम्यान पावसाचा जोर असाच कायम राहणार असून रत्नागिरी जिल्ह्यात 20 जुलै पर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानेच शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मागील 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 55.11 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड आणि राजापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. मंडणगडमध्ये 95 मिलीमीटर तर राजापूर तालुक्यात 92 मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या 24 तासांत झाली आहे. दापोली- 22 मिमी, खेड- 58, गुहागर-03, चिपळूण-75 , संगमेश्वर-69, रत्नागिरी-12, आणि लांजा तालुक्यात 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.