रत्नागिरी : मुसळधार पावसाने दक्षिण रत्नागिरीसह दापोली, गुहागरला झोडपलं आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. सोमवारी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस आज पहाटेपर्यंत मुसळधारपणे बरसत होता. त्यामुळे रात्री ठिकठिकाणी पाणी साचलं होतं.. दरम्यान आज सकाळपासून मात्र पावसाचा जोर ओसरला होता.
विजांच्या कडकडाटासह दक्षिण रत्नागिरीला पावसाने चांगली हजेरी लावली होती. रत्नागिरी, लांजा आणि राजापूर, गुहागर तसेच दापोलीमध्ये पावसाने चांगलीच बॅटिंग केली. त्यामुळे दक्षिण रत्नागिरीमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी बाजारपेठेत पाणी साचलं. तसेच मुख्य रस्त्यासह शहराच्या विविध भागात पाणी तुंबलं. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे पाटीलवाडी येथे पुलावरून पाणी गेल्याने 16 गावांचा संपर्क तुटला होता.
दरम्यान राजापूर शहरातील जवाहर चौक येथील पिकअप शेड पर्यंत पाणी पोहचल्याने काही दुकानदारही धास्तावले होते. गुहागर-भातगाव मार्गावर दरड कोसळल्याने हा मार्ग बंद आहे. तर मुसळधार पावसाने धामणसे ओरी रस्त्यावर रत्नेशवर मंदिर येथे मोरीवरील रस्ता खचल्याने धामणसे ओरी वाहतूक बंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यांमध्ये पडला असून या दोन्ही तालुक्यांमध्ये यावर्षी पहिल्यांदाच एका दिवसांत 200 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासांत राजापूरमध्ये 251 तर रत्नागिरीमध्ये 212 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल लांजा तालुक्यामध्ये 117 तर गुहागरमध्ये 116 तर दापोलीमध्ये 101 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गणपतीपुळे देवस्थानचं मोठं नुकसान
अतिवृष्टीचा फटका गणपतीपुळे येथील देवस्थानलाही बसला आहे. संरक्षक भिंत कोसळून, प्रदक्षिणा मार्गही ठिकठिकाणी खचला आहे. त्यामुळे देवस्थानचं मोठं नुकसान झालं आहे.
सोमवारी दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं. रत्नागिरी तालुक्यात तर तब्बल 200 मिलिमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडला. तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाने धुवांधार बरसात केली. या पावसाचा फटका गणपतीपुळे मंदिरालाही बसला. याठिकाणी येणाऱ्या भक्तगणासाठी उभारण्यात आलेल्या प्रदक्षिणा मार्गाची संरक्षक भिंत खचल्याने मोठं नुकसान झालं आहे. ठिकठिकाणी ही भिंत कोसळून प्रदक्षिणा मार्ग खचला आहे. तर तलावाचीही संरक्षक भिंत कोसळली आहे. त्यामुळे देवस्थानचं मोठं नुकसान झालं आहे.